बंद

    21.08.2021 राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: August 21, 2021

    राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार प्रदान
    लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, चित्रपटसृष्टीतील कलाकार पुरस्काराने सन्मानित

    गेल्या दीड वर्षात देशाने आणि राज्याने प्रथम करोना आणि त्यानंतर निसर्ग वादळ व तौते वादळ यांसारखी संकटे पहिली. या काळात संपूर्ण समाज एकत्र झालेला पाहायला मिळाला. सामन्यातील सामान्य व्यक्तीपासून तर डॉक्टर्स, पोलीस, कलाकार, लोकप्रतिनिधी या सर्व लोकांनी या संकट प्रसंगी आपले अद्भुत योगदान देऊन राष्ट्राप्रती आपले कर्तव्य बजावले. आगामी काळात देखील असेच योगदान दिल्यास कुठल्याही संकटाचा देशाला समर्थपणे मुकाबला करता येईल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    सपना सुबोध सावजी चरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, डॉक्टर्स, चित्रपटसृष्टीतील कलाकार व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र जनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    राज्यपालांच्या हस्ते आमदार गोवर्धन शर्मा, गोपीकिशन बाजोरिया व राजेश एकडे, माजी आमदार गजानन दाळू, ज्येष्ठ गायक हरिहरन, सुदेश भोसले, अभिनेते अनुप सोनी व अर्चना शर्मा, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, डॉ दीपक नामजोशी, डॉ दीपक पाटकर, डॉ जी पी रत्नपारखी, वॉकहार्ड रुग्णालयाचे प्रमुख डॉ हुझेफा खोराकीवाला, समाजसेविका मंजू लोढा, वाडिया हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ मिनी बोधनवाला, हॉकीपटू मर्विन फर्नांडीस, डॉ राहुल पंडित, डॉ. अमजद पठान, डॉ. समीर सदावर्ते, डॉ. नीरज मुरक़े, डॉ. वृशाली माने यांसह निवडक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

    यावेळी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी व सपना सुबोध सावजी चरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ राहुल सावजी व्यासपीठावर उपस्थित होते.