बंद

    21.07.2025: व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल राधाकृष्णन यांना दुःख

    प्रकाशित तारीख: July 22, 2025

    व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल राधाकृष्णन यांना दुःख

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

    ‘केरळच्या राजकारणातील भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाणारे अच्युतानंदन हे गेल्या सात दशकांपासून केरळच्या राजकीय क्षेत्रातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते. सार्वजनिक जीवनातील साधेपणा आणि जनतेप्रती बांधिलकीचे ते प्रतीक होते.

    केरळ विधानसभेचे दीर्घकाळ सदस्य आणि विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी निर्भयपणे काम केले आणि लोकशाही मूल्यांचे सशक्तपणे रक्षण केले. जनसामान्यांशी कायम नाळ जोडलेल्या व्हीएस अच्युतानंदन यांना केरळची जनता त्यांना अनेक पिढ्यांपर्यंत स्मरणात ठेवेल.

    श्री अच्युतानंदन यांना प्रत्यक्ष भेटण्याचे मला भाग्य लाभले होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात नेहमीच अत्युच्च आदर होता. त्यांच्या निधनाने राज्याने एक महान राजकीय पितामह आणि प्रगल्भ संसदपटू गमावला आहे.

    या महान नेत्याला मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या शोक संवेदना त्यांचे कुटुंबीय, आणि असंख्य चाहत्यांना कळवतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.