बंद

    21.04.2025 : महाराष्ट्र राजभवन येथे हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा

    प्रकाशित तारीख: April 21, 2025
    महाराष्ट्र राजभवन येथे हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा

    महाराष्ट्र राजभवन येथे हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा

    उत्कृष्ट हिमाचली नृत्य सादर केल्याबद्दल राज्यपालांकडून महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीला एक लाख रुपयांचे बक्षीस

    रतन टाटा राज्य कौशल्य विद्यापीठाला देखील एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

    आपल्या भाषेचा, प्रदेशाचा अभिमान बाळगा; परंतु त्याहीपेक्षा अधिक राष्ट्राभिमान बाळगा : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

    प्रत्येकाने आपल्या राज्याचा, प्रदेशाचा, संस्कृतीचा व मातृभाषेचा अभिमान अवश्य बाळगला पाहिजे. परंतु त्याहीपेक्षा अधिक राष्ट्रभिमान बाळगला पाहिजे.
    राष्ट्राभिमानाने प्रेरित होऊन जपान व जर्मनी या देशांनी शून्यातून सावरून फार मोठी प्रगती केली. राष्ट्रभक्तीला कठोर परिश्रम व समर्पण भावनेची जोड दिली तर भारताला देखील ‘विकसित भारत’ साकारण्याचे लक्ष्य गाठता येईल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे सोमवारी (दि. २१) ‘हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस’ समारंभपूर्वक साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राजभवनातर्फे हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

    यावेळी हिमाचल प्रदेशच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात उत्कृष्ट हिमाचली लोक गीत व नृत्य सादर केल्याबद्दल राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीला तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

    हिमाचल प्रदेश ही देवभूमी असून त्या राज्याला निसर्गाचे मुक्तहस्ते वरदान लाभले आहे असे सांगून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमामुळे आज देशातील सर्व राजभवनांमध्ये ‘हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा होत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

    अलीकडच्या काळात हिमाचल प्रदेशने पायाभूत सुविधा विकासासह सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. देशविदेशातील लोक पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशला भेट देतात. आपण देखील तीन वेळा हिमाचल प्रदेशला भेट दिली असे सांगून राज्यातील नागरिकांनी हिमाचल प्रदेशच्या विविध प्रेक्षणीय भागांना भेट द्यावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. परस्पर प्रदेशांना भेट दिल्यामुळे एकात्मता वाढेल असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर तसेच सर्व कलाकार विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हिमाचल प्रदेश राज्य स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ व बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या संगीत कला अकादमीच्या सहकार्याने करण्यात आले होते. गणेश बाग म्युनिसिपल हिन्दी स्कूल कुर्ला व कामगार नगर मुनिसिपल स्कूल कुर्ला यांनी नाटी व पांगी नृत्य सदर केले.

    राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रास्ताविक केले, तर अवर सचिव विकास कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

    कार्यक्रमाला पुडुचेरीचे माजी उपमुख्यमंत्री पेथापेरूमल वेलायुधम, राज्यपालांचे उपसचित एस राममूर्ती, कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच पालिकेच्या शिक्षण विभागाचे तसेच संगीत कला अकादमीचे पदाधिकारी उपस्थित होते.