21.02.2025: आसियान देशांमधील महिला उद्योजकांचे परस्पर सहकार्य कौतुकास्पद: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

आसियान देशांमधील महिला उद्योजकांचे परस्पर सहकार्य कौतुकास्पद: राज्यपाल सी पी राधाकृष्णन
आसियान देशांमधून भारत भेटीवर आलेल्या महिला उद्योजिका फिक्की महिला आघाडीच्या सहकार्याने भारतातील उद्योगांशी करीत असलेले परस्पर सहकार्य कौतुकास्पद असून यातून सर्व देशांमधील महिला उद्योजकांना प्रेरणा मिळेल असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
भारत आणि आसियान देशांमधील २० आघाडीच्या महिला उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. २१) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
भारत आणि आसियान देशांमधील उद्योजकांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सर्व देश परस्परांशी थेट विमानसेवेने जोडणे आवश्यक आहे असे सांगून नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरु होत असून त्यानंतर मुंबई अनेक देशांशी थेट विमान सेवेने जोडले जाईल व त्यातून उद्योगांना चालना मिळेल असे राज्यपालांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकाहून तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करीत असून भारतासोबत व्यापार वाढविण्यासाठी सध्याची वेळ अतिशय योग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. महिला उद्योजिकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याबद्दल राज्यपालांनी त्यांना धन्यवाद दिले.
आसियान देशांमधील महिला उद्योजक नेत्यांच्या या भेटीचे आयोजन फिक्की संसथेच्या महिला विभागाद्वारे करण्यात आले होते.
यावेळी फिक्की मुंबई महिला विभागाच्या अध्यक्षा आर्मीन दोर्डी व आसियान इंडिया अध्यक्षा विनिता बिंबेट यांनी महिला उद्योजिकांच्या भारत भेटीबाबत माहिती दिली.
फिलिपिन्स येथील संस्थेच्या आसियान सह-अध्यक्षा पॅसीटा जुआन, उद्योजिका मारिया ख्रिस्तिना कॉन्सेपसियान, तसेच इतर फिलिपिन्स आणि म्यानमार येथील महिला उद्योजिका यावेळी उपस्थित होत्या.
आसियान देशांतील महिला उद्योजिका आरोग्यसेवा यांसह विविध क्षेत्रांमध्ये व्यावसायिक सहकार्य वाढविण्यासाठी भारतभेटीवर आल्या आहेत.