बंद

    20.10.2023 : राज्यपालांच्या उपस्थितीत कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रवाना

    प्रकाशित तारीख: October 20, 2023

    भारत – पाक सीमेवर उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समारंभपूर्वक रवाना
    शिवकालीन गडकिल्ल्यांचे फोर्ट सर्किट तयार करावे : राज्यपाल रमेश बैस
    कुपवाडा येथील स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री

    नव्याने बांधण्यात आलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक पाहण्यासाठी देशभरातून लाखो लोक येतात. मात्र देशातील फार कमी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकिल्ले पाहिले आहेत. हे चित्र बदलून शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी शिवकालीन गडकिल्ल्यांचे फोर्ट सर्किट तयार करावे तसेच पर्यटकांना सर्व किल्ल्यांची माहिती देणारे पुस्तक तयार करावे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांमधून तरुणांना प्रेरणा तर मिळेलच, शिवाय गडकिल्ल्यांचा विकास झाल्यास त्यातून रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.
    राज्यपाल बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कुपवाड़ा, जम्मू – काश्मीर येथे उभारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (दि. २0) राजभवन मुंबई येथून समारंभपूर्वक रवाना करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन तसेच रथपूजन करण्यात आले.
    ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेला हा पुतळा कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटला स्थापनेसाठी देण्यात येणार आहे.
    अनेक राजांनी स्वतःसाठी राजमहाल बांधले. परंतु शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी राजमहाल न बांधता राज्य रक्षणासाठी गडकिल्ले बांधले. शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. महाराजांचे नाव घेऊन आपण प्रतापगडावर साडेपाचशे पायऱ्या चढून गेलो, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
    यावर्षी ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर भारतीय नौदल दिनाचा सोहळा होणार असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असल्याचे नमूद करून शिवाजी महाराजांची दृष्टी त्यांच्या काळाच्या फार पुढे होती. जुलमी मुघल राजवटीतून राज्य मुक्त करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याचे स्वप्न महाराजांनी पाहिले, असे राज्यपालांनी सांगितले.
    सन २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक आयोजित करण्याच्या दृष्टीने देश प्रयत्न करणार आहे, असे सांगून राज्यातील विद्यार्थ्यांना तरुणांना आतापासून विविध खेळांमध्ये तयार करुन देशासाठी अधिकाधिक पदके मिळविण्याचा राज्याने संकल्प करावा, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
    कुपवाडा येथील स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री
    देशाच्या सीमेवर अनेक मराठी जवान देशरक्षणाचे काम करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे सीमेवरील जवानांना हजार हत्तींचे बळ लाभेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. कुपवाडा येथील महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
    लंडन येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार: सुधीर मुनगंटीवार
    शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे लवकरच शिवभक्तांना दर्शनासाठी राज्यात आणली जाणार असून लंडन येथे लोकवर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचे जीवनकार्य लोकांना समजावे या करीत २० भाषांमधून महाराजांचे चरित्र ऐकण्याची सोय केली जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. ब्रेल लिपीतून देखील शिवाजी महाराजांचा इतिहास मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचा कुपवाडा येथील अश्वारूढ पुतळा देशात ऊर्जा निर्माण करण्याचे काम करेल असे त्यांनी सांगितले.
    कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’चे विश्वस्त अभयसिंह राजे शिरोळे, अध्यक्ष हेमंत जाधव, राजेंद्र खेडकर तसेच इतर निमंत्रित उपस्थित होते.