20.09.2022 : राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ३० वे आशीर्वाद राजभाषा पुरस्कार प्रदान
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ३० वे आशीर्वाद राजभाषा पुरस्कार प्रदान
विविध शासकीय निमशासकीय उपक्रमांच्या उत्कृष्ट गृहपत्रिकांना पुरस्कार प्रदान
हिंदीच नव्हे; सर्वच भारतीय भाषा राष्ट्रीय भाषा आहेत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
केवळ हिंदीच नव्हे, तर देशात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भारतीय भाषा या राष्ट्रीय आहेत. सर्वच भाषा या भारतमातेच्या कन्या आहेत. त्यामुळे सर्व भाषांचा सन्मान केला तर तो हिंदी भाषेचा सन्मान ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
‘आशीर्वाद’ या हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणाऱ्या साहित्यिक सामाजिक व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने देण्यात येणारे ‘३० वे आशीर्वाद राजभाषा पुरस्कार’ तसेच उकृष्ट गृहपत्रिका पुरस्कार राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दिनांक २०) राजभवन येथे देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
कुलपती या नात्याने आपण प्रत्येक विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात सूत्र संचलन इंग्रजी भाषेत न करता मराठी भाषेत करण्याबद्दल आग्रही राहिलो. मराठी भाषा शिकण्यास देखील सोपी आहे असे आपण स्वतः अनुभवले. हिंदी भाषा अनायासेच वाढत आहे व परदेशात गेल्यावर तर भारतातील सर्व राज्यातले लोक हिंदीतच संवाद साधतात असे राज्यपालांनी सांगितले.
अनेक गृहपत्रिकांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत असून सार्वजनिक उपक्रम तसेच सरकारी संस्थांमध्ये अनेक प्रतिभावंत अधिकारी असल्याचे दिसून येते असे राज्यपालांनी सांगितले.
अनेकदा भाषिक आंदोलनामध्ये इंग्रजी पाट्यांना काळे फासणे, हिंदी पाट्यांना काळे फासणे असे प्रकार होत असतात. मात्र प्रत्येकाने आपली रेषा वाढविण्यासाठी इतरांची रेषा मिटवणे आवश्यक नाही, असे राज्यपालांनी सांगितले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी हिंदी प्रचाराचे कार्य करणारे केंद्रीय कार्यालय – मध्य रेल्वे, रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (नौसेना), राष्ट्रीय औद्योगिक इंजिनियरी संस्थान (नीटी), राष्ट्रीयीकृत बँक – भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र, सार्वजनिक उपक्रम – भारतीय जीवन विमा निगम, न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत पेट्रोलियम व राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, सर्वोत्तम राजभाषा कार्यान्वयन पुरस्कार नराकास, मुंबई उपक्रम, अध्यक्ष हिंदुस्थन पेट्रोलियम यांना देण्यात आला.
यंदापासून श्रेष्ठ मूळ साहित्यिक कृतीसाठी देण्यात येणारा स्वर्गीय डॉ अनंत श्रीमाळी स्मृती पुरस्कार डॉ सुलभा कोरे, सहायक महाप्रबंधक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांना देण्यात आला.
दिनेश पारधी, भारतीय स्टेट बँक, पार्श्वगायिका कविता सेठ व सुप्रसिद्ध व्हॉइस आर्टिस्ट अंकुर झवेरी यांना देखील आशीर्वाद राजभाषा गौरव पुरस्कार देण्यात आले.
अंबर (केंद्रीय कापूस प्रद्योगिकी संशोधन संस्था ), युनिअन सृजन (युनिअन बँक ऑफ इंडिया), विकास प्रभा (आयडीबीआय बँक), रेल दर्पण (पश्चिम रेल्वे), जलतरंग (माझगाव डॉक ), प्रयास (भारतीय स्टेट बँक) व प्रेरणा (द न्यू इंडिया अशुरन्स कंपनी) यांना उत्कृष्ट गृहपत्रिका पुरस्कार देण्यात आले.
कार्यक्रमाला आशीर्वाद संस्थेचे मानद अध्यक्ष बृजमोहन अग्रवाल, डॉ उमाकांत बाजपेयी, नीता बाजपेयी, ज्युरी पत्रकार डॉ वागीश सारस्वत, अध्यक्ष सुधा सिंह, उपाध्यक्ष डॉ बनमली चतुर्वेदी, अरविंद राही, राजेश मिश्रा आदी उपस्थित होते.