बंद

    20.07.2021 : राज्यपालांच्या हस्ते मराठी – हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांचा गौरव

    प्रकाशित तारीख: July 20, 2021

    राज्यपालांच्या हस्ते मराठी – हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांचा गौरव

    कलाकारांनी आपल्या प्रतिभेचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करावा : राज्यपाल

    भारत ही ‘बहुरत्ना वसुंधरा’ असून या देशात वेळोवेळी प्रतिभा संपन्न व्यक्ती निर्माण झाल्या आहेत. पोर्तुगिझ, ब्रिटीश, मुघल आदी परकीय आक्रमकांच्या काळात देखील या देशातील प्रतिभा तसूभरही कमी झाली नाही. प्रतिभासंपन्न व्यक्तींनी आपल्या कलागुणांचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी केल्यास देश अधिक प्रगती करेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेच्या वतीने ‘मेड इन इंडिया आयकन्स: महाराष्ट्र सन्मान’ राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २०) राजभवन येथे प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

    हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक कुमार शानू, उदित नारायण, भजन सम्राट अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलीया यांसह विविध क्षेत्रातील ४२ व्यक्तींना महाराष्ट्र सन्मान प्रदान करण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव व स्वप्नील जोशी यांना देखील महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेचे अध्यक्ष संदीप घुगे व्यासपीठावर उपस्थित होते.