बंद

    20.02.2021 : कठीण काळात समाजासाठी कार्य केल्यास देश टिकून राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: February 20, 2021

    प्रसिद्ध कॉर्पोरेटस राज्यपालांच्या हस्ते सन्मानित

    लार्सन व टुब्रो, ओएनजीसी, आयटीसी, अशोक लेलँड यांना सामाजिक दायित्वासाठी पुरस्कार रतन टाटा यांना जीवन गौरव पुरस्कार

    कठीण काळात समाजासाठी कार्य केल्यास देश टिकून राहतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुंबई: दि. 20 : करोनासारखी संकटे आलीत तशीच पुढेही येत राहतील. मात्र अशा कठीण काळात एकमेकांना सहकार्य केल्यास समाज आणि देश टिकून राहील, असा आशावाद राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. राजभवन येथे वोकहार्ड फाउंडेशनच्या वतीने नामवंत कॉर्पोरेट संस्थांना सामाजिक दायित्वासाठी सीएसआर शायनिंग स्टार अवॉर्डस प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    व्यासपीठावर वोकहार्ड फाउंडेशनचे विश्वस्त तथा मुख्याधिकारी हुजैफा खोराकीवाला तसेच भारतीय विकास संस्थानचे अध्यक्ष डॉ. योगेश दुबे उपस्थित होते.

    जीवनगौरव पुरस्कार श्री. रतन टाटा यांना देण्यात आला. त्यांच्या अनुपस्थितीत शंतनू नायडू यांनी पुरस्कार स्वीकारला.

    राज्यपाल म्हणाले, गरीब पीडितांची चिंता करणाऱ्या दानशूर लोकांमुळे समाज जिवंत राहतो. दुसऱ्यांना प्रकाश देण्याच्या त्यागी भावनेमुळे मानवी कल्याण होते. शंभर हातांनी धन संचय करावे, परंतु ते धन हजार हातांनी समाजासाठी वितरीत देखील करावे, ही आपली संस्कृती आहे. समाजाने जे आम्हाला दिले आहे त्याची परतफेड म्हणून आपण समाजाला देणे लागतो ही भावना महत्त्वाची आहे. एकमेकांना सहकार्य करण्याच्या वृत्तीमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे बळी कमी प्रमाणात गेले, असे त्यांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध संस्थांना आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, आदी क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार वितरित करण्यात आले.

    वैयक्तिक विशेष योगदानाबद्दल डॉ.जितेंद्र जोशी, श्रीकांत बडवे व सुरज कुमार यांना तर उद्योग क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल कोटक महिंद्रा बँक लि. सन्मानित करण्यात आले.

    अॅनिमल वेल्फेअरसाठी ओएनजीसी यांना सन्मानित करण्यात आले. बालकल्याण क्षेत्रातील कामगिरीसाठी वेदांता लिमीटेड, कोविड क्षेत्रातील कार्यासाठी हिंदुस्थान युनिलिव्हर लि., दिव्यांग घटकांसाठी हिरो मोटोकॉर्प लि.,शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, पर्यावरणासाठी अशोक लेलँड लि., आरोग्य क्षेत्रासाठी गेल (इंडिया) लि., कौशल्य विकासासाठी लार्सन अँड टुर्बो लि., ट्रान्सजेंडर एम्पपॉवरमेंटसाठी एस्सार, पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील कामगिरीसाठी आयटीसी लि., महिला सबलीकरणासाठी आरईसी लि. यांना सन्मानित करण्यात आले.

    डॉ. हुजैफा खोराकिवाला यांनी स्वागत भाषण केले तर डॉ. योगेश दुबे यांनी आभार मानले.

    DGIPR, मंत्रालय