20.01.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दिन साजरा
राज्यपालांच्या उपस्थितीत नॅबचा ७४ वा स्थापना दिन साजरा
अधिकाधिक लोकांनी नेत्रदान करण्याचा संकल्प करावा : राज्यपाल सी पी राधाकृष्णन
आपण स्वतः तसेच आपल्या कुटुंबातील सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. नेत्रदानातून अनेक दृष्टिहीन व्यक्तींना नवी दृष्टी प्राप्त होऊ शकते. यास्तव अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करावा असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब) या अंध व्यक्तींच्या शिक्षण, पुनर्वसन व रोजगारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचा ७४ वा स्थापना दिवस संस्थेच्या वरळी मुंबई येथील सभागृहात सोमवारी (दि. २०) संपन्न झाला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
झारखंड येथे आपण राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसाला ७३ लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला होता, तर २०२४ साली महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधानांच्या वाढदिवसाला आपल्या आवाहनानुसार ७४० व्यक्तींनी नेत्रदानाचा संकल्प केला. यंदा होणाऱ्या पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसाला ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करून घेण्याचे लक्ष्य आपण ठेवले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
नॅब संस्थेच्या स्थापनेत क्रिकेटपटू विजय मर्चंट यांचे योगदान होते हे समजल्यामुळे आपला त्यांच्याप्रती असलेला आदर शतपटींनी वाढला आहे, असे सांगून नॅब ही संस्था अंध तसेच दृष्टिबाधित व्यक्तींकरिता आशा जागवणारी व सक्षमीकरणाची हमी देणारी संस्था ठरली आहे असे राज्यपालांनी सांगितले.
आपले पूर्ववर्ती राज्यपाल रमेश बैस यांनी ‘नॅब’ला ब्रेल प्रिंटिंग प्रेस खरेदी करण्यास अर्थसहाय्य केले असल्याचे नमूद करून यापुढे देखील राजभवन नॅबच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे राज्यपालांनी सांगितले.
आपल्या ब्रेल प्रिंटिंग प्रेस, टॉकिंग बुक्स, परफ्युमरी प्रशिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून नॅब दृष्टीहीन व्यक्तींना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सक्षम करीत असल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाला नॅबचे अध्यक्ष हेमंत टकले, मानद महासचिव हरिंदर कुमार मल्लिक, कार्यकारी महासचिव डॉ विमल देंगडा, कार्यकारी संचालक पल्लवी कदम, संस्थेचे आश्रयदाते व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध पारितोषिके वितरण करण्यात आली.