19.08.2024 : विविध संघटनांकडून राज्यपालांचे रक्षाबंधन
पालघर येथील आदिवासी महिला, ब्रह्माकुमारी यांचेकडून राज्यपाल राधाकृष्णन यांना राखी
विविध संघटनांकडून राज्यपालांचे रक्षाबंधन
रक्षाबंधनानिमिमत्त विविध सामाजिक सांस्कृतिक व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सोमवारी (दि. १९) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना राखी बांधली. यावेळी राज्यपालांनी सर्वांना रक्षा बंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संस्थेच्या भगिनींनी राज्यपालांना ओवाळले व राखी बांधली तसेच माउंट अबू येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी ब्रह्मकुमारी रुक्मिणीबेन, बी के वंदना, बी के नेहा, बी के माला व बी के केतन भाई उपस्थित होते.
‘सेवा विवेक’ ग्राम विकास केंद्र, भालिवली, जिल्हा पालघर येथून आलेल्या आदिवासी बांबू महिला कारागिरांनी राज्यपालांना बांबूपासून तयार केलेली पर्यावरण स्नेही राखी बांधली. यावेळी ‘सेवा विवेक’चे मार्गदर्शक रमेश पतंगे, संचालक प्रदीप गुप्ता, मुख्याधिकारी लुकेश बंड उपस्थित होते.
भारत विकास परिषद माटुंगा संस्थेचे अध्यक्ष रिषभ मारू यांनी संस्थेच्या सदस्य व माजी नगरसेविका नेहल शाह यांचेसह राज्यपाल राधाकृष्णन यांना राखी बांधली.
दिवंगत समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन (बालगृह) सासवड संस्थेच्या अधिक्षिका स्मिता पानसरे व सुजाता गायकवाड यांनी संस्थेतील विद्यार्थिनींसह राज्यपालांची भेट घेऊन त्यांना राखी बांधली तसेच संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. .