19.03.2025: न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत

न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे राज्यपाल, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत
न्यूझीलंड पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व सुशासनासाठी ओळखला जाणारा देश
राजभवन येथील स्नेहभोजनाला क्रिकेटपटू एजाज पटेल उपस्थित
न्यूझीलंड अतिशय पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त व सुशासनासाठी ओळखला जाणारा देश असून देशात ८८ टक्के नवीकरणीय ऊर्जा वापरली जाते. न्यूझीलंड व भारत देशात अनेक क्षेत्रात सहकार्य सुरु असून आपला देश भारत आणि विशेषतः महाराष्ट्राशी हरित ऊर्जा, शिक्षण, कृषी तंत्रज्ञान, दुग्धव्यवसाय, क्रीडा तसेच आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आदी विषयांमध्ये सहकार्य वाढविण्यास उत्सुक असल्याचे प्रतिपादन न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन यांनी आज येथे केले.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टॉफर लक्सन तसेच त्यांचेसह आलेल्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे राज्याच्या वतीने बुधवारी (दि. १९) राजभवन, मुंबई येथे स्वागत केले, त्यावेळी ते बोलत होते.
आपली नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी बैठक झाल्याचे सांगून भारत २०३६ साली ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी आपणांस सांगितल्याचे क्रिस्टॉफर लक्सन यांनी राज्यपालांना सांगितले.
न्यूझीलंड क्रिकेटशिवाय अनेक खेळात आघाडीवर असून ऑलिम्पिक मध्ये आपल्या देशाची कामगिरी चांगली असल्यामुळे न्यूझीलंडला भारताशी क्रीडा क्षेत्रात सहकार्य करण्यास नक्कीच आवडेल असे त्यांनी सांगितले.
मुंबईत जन्मलेला एजाज पटेल हा खेळाडू आज न्यूझीलंड कडून खेळत आहे ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
आपण महाराष्ट्रातील २९ सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती असून राज्यातील विद्यापीठे व न्यूझीलंड मधील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी, शिक्षक तसेच सत्र आदान प्रदान झाल्यास त्याचा उभय देशांना लाभ होईल असे राज्यपालांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास, झोपडपट्टी मुक्त मुंबई, पायाभूत सुविधा, आदी क्षेत्रात कार्य करीत असून नवी मुंबई विमानतळ व वाढवण बंदर तयार झाल्यानंतर मुंबई जगाशी अधिक चांगले जोडले जाईल असे राज्यपालांनी सांगितले.
भारतीय उद्योगांशी संयुक्त उपक्रम करण्यास सध्याची वेळ सर्वोत्तम असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी आयोजित स्नेहभोजन समारोहाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, तर न्यूझीलंडच्या वतीने भारतीय वंशाचे माजी गव्हर्नर जनरल सर आनंद सत्यानंद, क्रिकेटपटू एजाज पटेल, पंतप्रधान कार्यालयाचे माध्यम अधिकारी मायकेल फोर्ब्स, अतिरिक्त मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, न्यूझीलंड पंतप्रधानांचे प्रेस सेक्रेटरी मॅट यंग, समाजमाध्यम सल्लागार जेकब ओ’फ्लाहर्टी, मार्क टॅलबोट, न्यूझीलंडचे भारतातील उच्चायुक्त पॅट्रिक राटा, जोआना केम्पकर्स, मॅथ्यू आयर्स, मुंबईतील उप-उच्चायुक्त ग्राहम राऊस व उद्योजक हे देखील उपस्थित होते.