बंद

    19.02.2022 : शिवाजी महाराज शक्ती, भक्ती, बुद्धी व युक्तीचा संगम

    प्रकाशित तारीख: February 19, 2022

    शिवाजी महाराज शक्ती, भक्ती, बुद्धी व युक्तीचा संगम

    भारताच्या विविध प्रांतांमध्ये धुरंधर योद्धे होऊन गेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज शक्ती, भक्ती, बुद्धी व युक्तीचा संगम असलेले तेजःपुंज राष्ट्रीय नेते होते. शिवाजी महाराजांसारखे प्रेरणादायी नेते अनेक युगांनंतर जन्म घेतात. महाराजांचे अपुरे स्वप्न पूर्ण करणे हेच त्यांना सच्चे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवसंग्राम या सामाजिक संघटनेच्या वतीने शिवाजी पार्क दादर मुंबई येथे शनिवारी एका भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
    कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे प्रामुख्याने उपस्थित होते.
    छत्रपती शिवाजी केवळ महाराष्ट्राचे आराध्य नेते नसून ते संपूर्ण देशाकरिता पूजनीय असून महाराष्ट्राबाहेर विविध राज्यांमधील शालेय मुलांना देखील शिवाजी महाराजांच्या शौर्याबद्दल अधिक माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
    आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी मानत असू तर आपण समाजातील कुप्रथा व चुकीच्या चालीरिती संपविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
    राणा प्रताप, शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्वांनी वेगवेगळ्या ध्येयप्राप्तीसाठी संग्राम केला होता. संग्राम करताना सर्वांना सोबत घेतले पाहिजे व त्यानंतर सहकार्याची भावना असली पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.