बंद

    18.12.2021: राज्यपालांच्या हस्ते करोना काळात विविध क्षेत्रात नवोन्मेष करणाऱ्या उद्यमींचा सत्कार

    प्रकाशित तारीख: December 18, 2021

    राज्यपालांच्या हस्ते करोना काळात विविध क्षेत्रात नवोन्मेष करणाऱ्या उद्यमींचा सत्कार
    नवोन्मेषन मानवतेच्या कल्याणासाठी असावे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    एकविसावे शतक भारताचे असेल व देशातील युवा नवोन्मेषक हे परिवर्तन घडवून आणतील असे सांगताना नवोन्मेषन (इनोव्हेशन) विनाशकारी नसावे तर ते संरचनात्मक व मानवतेच्या कल्याणासाठी असावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    करोना काळात विविध क्षेत्रांमध्ये नवोन्मेषन करून देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या नवोन्मेषी उद्योजकांचा शनिवारी (दि १८) राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे ‘इम्पॅक्ट क्रिएटर्स अवार्ड’ देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    कार्यक्रमाचे आयोजन ‘बिलेनियम डिवाज’ या महिला उद्योजिकांच्या संस्थेने केले होते.

    कार्यक्रमाला भारत सरकारचे मुख्य नवोन्मेषन अधिकारी डॉ अभय जेरे, बिलेनियम डिवाज संस्थेच्या अध्यक्षा श्वेता शालिनी, संचालक भावेश कोठारी, सहसंचालिका मीनल कोठारी व दीपिका सिंह उपस्थित होते.

    विज्ञान व तंत्रज्ञानातील स्थित्यंतरे अतिशय गतीने होत असून पूर्वी परवलीचा शब्द असलेला संशोधन हा शब्द मागे पडून नॅनोतंत्रज्ञान व अलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द परवलीचे झाले आहेत असे सांगताना विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेषनाला भारतीय ज्ञान – अध्यात्माची जोड दिली तर नवोन्मेषाचे कार्य अधिक शाश्वत व हितकर होईल असे राज्यपालांनी सांगितले.

    ‘नव्या शिक्षण प्रणालीने ‘चतुर’ नव्हे; ‘रँछो’ निर्माण करावे: डॉ अभय जेरे

    चीन व अमेरिकेनंतर भारत ही जगातील तिसरी मोठी नवोन्मेषन प्रणाली म्हणून उदयास आली आहे. मात्र बौद्धिक मालमत्ता नोंदणीच्या बाबतीत भारत फार मागे आहे. चीन दरवर्षी १५ लाख पेटंट नोंदवित आहे तर भारत केवळ पन्नास हजार नोंदवित असल्याचे नमूद करून भारतीय शिक्षण प्रणालीने या नंतर पाठांतर करणारे ‘चतुर’ निर्माण न करता नवोन्मेषन करणारे ‘रँछो’ निर्माण केले पाहिजे, असे भारत सरकारचे मुख्य नवोन्मेषन अधिकारी डॉ अभय जेरे यांनी यावेळी सांगितले.
    भारतात ४०,००० शिक्षण संस्था असून अंशी टक्क्यांहून अधिक संस्थांनी आजवर एकही पेटंट नोंदविले नाही, ही चिंतेची बाब असल्याचे सांगताना भारताला जगद्गुरू करायचे असेल तर जागतिक स्तरावर परिणाम करू शकतील अश्या नवकल्पना निर्माण कराव्या लागतील, असे जेरे यांनी सांगितले.
    राज्यपालांच्या हस्ते यावेळी आर्थिक समावेशन, संशोधन, आरोग्य, सेवा, उद्योग आदी क्षेत्रातील ३५ नवोन्मेषकांचा व उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य अधिकारी आशिष चौहान, बिर्ला समूहाच्या नीरजा बिर्ला, डॉ बत्रा क्लिनिकचे डॉ अक्षय बत्रा, डॉ राधाकृष्णन पिल्लई आदींचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.