बंद

    18.11.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत सहस्त्र ब्रह्म कलश अभिषेक महोत्सवाला सुरुवात

    प्रकाशित तारीख: November 18, 2022

    माटुंग्याच्या गुरुवायूर मंदिराचे शतकी वर्षात पदार्पण

    राज्यपालांच्या उपस्थितीत सहस्त्र ब्रह्म कलश अभिषेक महोत्सवाला सुरुवात

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत भांडारकर रोड, माटुंगा, मुंबई येथील आस्तिक समाजाच्या कोचू (लहान) गुरुवायूर मंदिर येथे दुर्मिळ अश्या ‘महा द्रव्यवर्ती सहस्त्र ब्रह्म कलश अभिषेक’ महोत्सवाला शुक्रवारी (दि. १८) सुरुवात झाली.

    सुरुवातीला राज्यपालांनी मंदिरातील प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण, हनुमान, कार्तिकेय, नवग्रह, गुरुवायूर, सुब्रह्मण्य, अय्यप्पा आदी देवीदेवतांचे दर्शन घेतले व उपस्थितांशी संवाद साधला. ज्येष्ठ पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी यावेळी कृष्णभजन व नामसंकीर्तन सादर केले.

    देशातील लोकांची भाषा व वेशभूषा वेगवेगळी असली तरीही आसेतु हिमाचल भारतीय लोकांचा अंतर्यामी परमेश्वर एकच आहे. मथुरेत जन्मलेला, वृंदावनात वाढलेला, कुरुक्षेत्रावर गीता प्रतिपादन करणारा व गुरुवायूर येथे प्रतिष्ठीत असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा एकच आहे. देशातील या एकात्मतेच्या मजबूत धाग्यामुळेच अनेक परकीय आक्रमणे झाली तरी देखील देश एकसंध राहिला असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

    केरळच्या कालडी येथे जन्मलेल्या आदी शंकराचार्यांनी देशात चार वेगवेगळ्या भागात धर्मपीठे स्थापन करून देशाचे ऐक्य अबाधित ठेवले असे राज्यपालांनी सांगितले.

    सन १९२३ साली स्थापन करण्यात आलेले आस्तिक समाज देवस्थान आपल्या शतकी वर्षात पदार्पण करीत आहे. दि. १८ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत चालणाऱ्या या महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी गुरुवायूर केरळ येथील श्री कृष्ण मंदिराचे मुख्य तंत्री पी सी दिनेशन नम्बुदिरीपाद, आस्तिक समाज देवस्थानचे अध्यक्ष वेंकटरमण, सचिव पी व्ही रामास्वामी, विश्वस्त सी एस परमेश्वर व भाविक उपस्थित होते.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते अध्यक्ष वेंकटरमण, सचिव पी व्ही रामास्वामी, कोषाध्यक्ष गोविंद कुट्टी, उपाध्यक्ष सी व्ही सुब्रमण्यम, विश्वस्त रामकृष्ण, सी एस परमेश्वर, मुरली, कल्याण कृष्णन, श्रीकुमार व पद्मनाभन यांचा सत्कार करण्यात आला.