बंद

    18.04.2022 : पां. वा. काणे यांचे संशोधन कार्य पुढे नेण्याचा विद्यापीठांनी संकल्प करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: April 18, 2022

    पां. वा. काणे यांचे संशोधन कार्य पुढे नेण्याचा विद्यापीठांनी संकल्प करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र व भारतीय संस्कृती याविषयी केलेले अफाट संशोधन कार्य केवळ थक्क करणारे आहे. आपल्या कार्यातून काणे यांनी देश, समाज व संस्कृतीचा गौरव वाढविला. विद्यापीठ, संशोधक व शिक्षणतज्ज्ञांनी संकल्प करून त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    थोर कायदेपंडित व धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १८) राजभवन येथे एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    एशियाटिक सोसायटी तसेच टपाल विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाला सोसायटीच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष एकनाथ क्षीरसागर, सोसायटीच्या अध्यक्षा विस्पी बालापोरिया, विश्वस्त डॉ भालचंद्र मुणगेकर, महाराष्ट्र सर्कलच्या मुख्य पोस्ट मास्तर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे, सोसायटीच्या कार्यवाहू मानद सचिव मंगला सरदेशपांडे तसेच काणे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    सार्वजनिक जीवनात वावरत असताना देखील काणे, डॉ आंबेडकर यांनी जोपासलेल्या व्यासंगाचा विचार करतो त्यावेळी हे कुणी अवतारी पुरुषच असावे असे आपल्याला वाटते असे नमूद करून एशियाटीक सोसायटीमध्ये बसून त्यांच्यासारख्या महान लोकांनी तपस्या केली असल्यामुळे ज्ञानाचे भंडार असलेली सोसायटी सर्व संकटांवर मात करून अवश्य जगेल याबद्दल आपण आश्वस्त असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राचे हिंदी अनुवादित खंड वाचले असल्याचे नमूद करून विद्यापीठांमध्ये आता आंतरशाखीय अध्ययनाचे पर्याय उपलब्ध असताना संशोधकांनी काणे यांचे ग्रंथ अवश्य अभ्यासावे. त्यातून समाजाला उत्तम नेतृत्व लाभेल असे राज्यपालांनी सांगितले.

    एशियाटिक सोसायटी तसेच पोस्ट विभागाचे नेतृत्व कर्तृत्ववान महिला करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

    सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ सुरज पंडित यांनी काणे यांच्या कार्याचा परिचय करून दिला तर मंगला सरदेशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.