बंद

    18.03.2023 : राज्यपालांकडून झेवियर संस्थेच्या कार्याचा गौरव

    प्रकाशित तारीख: March 18, 2023

    राज्यपालांकडून झेवियर संस्थेच्या कार्याचा गौरव

    झेवियर अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    देशभरातील सेंट झेवियर शैक्षणिक संस्था शैक्षणिक गुणवत्तेशिवाय शिस्त, समर्पण भाव, धर्मनिरपेक्षता व राष्ट्रीयत्वाच्या भावनेच्या संवर्धनासाठी सुपरिचित आहेत. संस्थेनी देशाला उत्तम खेळाडू, कलाकार, वैज्ञानिक, समाजसेवक व चांगले नागरिक दिले आहेत, त्यामुळे केवळ मुंबई व महाराष्ट्रातच नव्हे तर देशात झेवियर संस्थेचे नाव आदराने घेतले जाते, या शब्दात राज्यपाल रमेश बैस यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव केला.

    झेवियर इन्स्टिट्युशन ऑफ इंजनिअरिंग या झेवियर परिवारातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा १४ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या माहीम येथील प्रांगणात शनिवारी (दि. १८) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    झेवियर संस्थेने आयोजित केलेला दीक्षांत समारोह हा आपला मुंबईतील पहिलाच दीक्षांत समारोह असल्याचे नमूद करून देशाच्या प्रगतीच्या भावी वाटचालीत वैज्ञानिकांसह अभियंत्यांचे योगदान महत्वाचे असेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातील अभियंत्यांमुळे भारताला जगाच्या माहिती तंत्रज्ञानाची राजधानी अशी ओळख मिळाल्याचे नमूद करून अभियांत्रिकी स्नातकांनी समाज व देशासाठी काम केले तर ते दीर्घ काळ स्मरणात ठेवले जाईल असे राज्यपालांनी सांगितले.

    समूह विद्यापीठाकडे वाटचाल

    सेंट झेवियर शैक्षणिक संस्था आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयासह तीन इतर संस्थांच्या सहकार्याने स्वतंत्र समूह विद्यापीठ निर्मितीसाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती झेवियर अभियांत्रिकी संस्थेचे संचालक डॉ जॉन रोझ यांनी यावेळी दिली.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते महाविद्यालयाच्या वार्षिक विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले, तसेच तीन विद्याशाखांमधील प्रत्येकी ३ गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. दीक्षांत समारोहात एकूण २७७ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

    यावेळी सेंट जोसेफ विद्यापीठ, बंगळूरुचे कुलगुरू डॉ व्हिक्टर लोबो, मद्रास विद्यापीठाचे माजी कुलगुरू इग्नासिमुथू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वय. डी. वेंकटेश, झेवियर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र शिंदे, संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी, स्नातक व पालक उपस्थित होते.