बंद

    17.06.2026: विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण -राज्यपाल

    प्रकाशित तारीख : June 17, 2026
    17.06.2026: विविध देशांच्या मुंबईतील वाणिज्यदूतांच्या अनौपचारिक परिषदेचे उदघाटन आज राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या उपस्थितीत बॉम्बे जिमखाना येथे संपन्न झाले.  'गेट वे हाऊस' या संस्थेमार्फत वाणिज्यदूतांच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यामध्ये  वाणिज्यदूतांची   भूमिका महत्त्वाची भूमिका असून महाराष्ट्रासोबत व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, व्हिसा सुविधा आणि लोकसंपर्क वाढविण्यामध्ये मुंबईस्थित वाणिज्यदूत महत्वाचे योगदान देतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.  'गेट वे हाऊस'च्या कार्यकारी संचालक मनजित कृपलानी यांनी प्रास्ताविक केले, तर एझेडबीचे सहसंस्थापक बेहराम वकील यांनी आभार प्रदर्शन केले.

    विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करण्यात महावाणिज्यदूतांची भूमिका महत्त्वपूर्ण
    -राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    मुंबई, दि. 17 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताचा जागतिक स्तरावरील प्रभाव आणि प्रतिष्ठा लक्षणीयरीत्या वाढली असून ‘विकसित भारत 2047’ या राष्ट्रीय ध्येयपूर्तीसाठी आंतरराष्ट्रीय समुदाय, भारतीय प्रवासी आणि राजनैतिक प्रतिनिधी हे महत्त्वाचे भागीदार ठरत आहेत. याचबरोबर विविध क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्य वृद्धींगत करण्यात महावाणिज्य दूतांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

    बॉम्बे जिमखाना येथे गेट वे हाऊस संस्थेमार्फत आयोजित विविध देशांच्या महावाणिज्यदूतांच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिबिंब विविध देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींच्या उपस्थितीत दिसून येते. मुंबईतील कॉन्सुलर समुदाय आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असून व्यापार, गुंतवणूक, सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन, व्हिसा सुविधा आणि लोकसंपर्क वाढविण्यासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

    मुंबई हे दीर्घकाळापासून जागतिक स्तरावरील महत्त्वाचे शहर राहिले आहे. महाराष्ट्र हे देशातील आघाडीचे औद्योगिक राज्य, नवोपक्रम व उद्योजकतेचे केंद्र तसेच परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून उदयास आल्याने अनेक देशांनी येथे आपली राजनैतिक आणि व्यापारी कार्यालये स्थापन केली आहेत. महाराष्ट्राने भारताच्या जागतिक संवादासाठी नेहमीच प्रवेशद्वाराची भूमिका बजावली असून विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, मंत्री, राजदूत आणि आंतरराष्ट्रीय नेत्यांनी राज्याला भेट दिली आहे. या भेटींमुळे आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्याला चालना मिळाल्याचे राज्यपालांनी नमूद केले.

    राज्यपाल म्हणाले की, राजनैतिक संबंधांमुळे विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राजनैतिक समुदायाशी संवाद सुलभ करण्यासाठी तसेच व्यापार व गुंतवणूक प्रोत्साहनासाठी स्वतंत्र राजशिष्टाचार विभाग स्थापन केला आहे. यामुळे जागतिक भागीदारीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन गुंतवणूकदारांना महाराष्ट्र अधिक स्वागतशील आणि प्रतिसादक्षम राज्य म्हणून अनुभवास येईल.

    राज्यपालांनी विद्यापीठांचे कुलपती या नात्याने जागतिक शैक्षणिक सहकार्याला विशेष प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली. विविध देशांतील विद्यार्थी, संशोधक आणि विद्वानांनी महाराष्ट्रातील उच्च शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकता उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि तंत्रज्ञान संस्था जागतिक दर्जाच्या शिक्षण व संशोधनासाठी अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या पर्यटन क्षमतेवर प्रकाश टाकताना राज्यपालांनी इतिहास, संस्कृती, अध्यात्म, निसर्ग आणि आधुनिक विकास यांचा अद्वितीय संगम असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना जागतिक पातळीवर प्रोत्साहन देण्याचे आवाहन विविध देशांच्या प्रतिनिधींना केले.

    व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, पर्यटन, नवोपक्रम, संस्कृती आणि शाश्वत विकास या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र आणि जगातील विविध देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी संयुक्तपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

    गेट वे हाऊसच्या कार्यकारी संचालक मनजित क्रिपलानी यांनी प्रास्ताविकाद्वारे संस्थेच्या कार्याची माहिती देऊन कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी भूमिका स्पष्ट केली. तर, एझेडबीचे सहसंस्थापक बहराम वकील यांनी राज्यपालांचे आभार मानले.
    ०००००