बंद

    17.05.2023 : अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: May 17, 2023

    २०२८ लॉस एंजेल्स ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबद्दल अमेरिका प्रयत्नशील : राजदूत एरिक गारसेटी

    अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे : राज्यपाल रमेश बैस

    सन २०२८ साली लॉस एंजेल्स येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा या दृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेटी यांनी आज येथे दिली. सन २०३६ साली भारताने देखील मुंबई आणि अहमदाबाद येथे ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत विचार केला पाहिजे असे त्यांनी सुचवले.

    राजदूत पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच मुंबई भेटीवर आलेल्या राजदूत एरिक गारसेटी यांनी बुधवारी (दि. १७) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

    आपण स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असून भारतात असेपर्यंत क्रिकेटमधील छोटेमोठे तज्ज्ञ होण्याचा आपला मानस आहे, असे सांगून आयपीएल स्पर्धेतील अंतिम सामना पाहण्यासाठी आपण गुजरात येथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण दहा वर्षे लॉस एंजेल्सचे मेयर होतो, असे सांगून लॉस एंजेल्सच्या क्रिकेट टीमचे आश्रयदाते व्हावे यासाठी आपण अभिनेते शाहरुख खान यांना कालच गळ घातल्याची माहिती त्यांनी दिली.

    पुढील चार महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात टोकियो, ऑस्ट्रेलिया, वॉशिंग्टन व नवी दिल्ली येथे चार बैठकी होणार असून अंतरिक्ष विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, सप्लाय चेन यांसह संरक्षण क्षेत्रात उभय देशांमध्ये सहकार्य वाढविण्याचे दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

    आपण चौदा वर्षाचे असताना प्रथम भारतात आलो होतो. त्यानंतर राजदूत म्हणून भारतात येणे हा आपल्यासाठी मोठा बहुमान असल्याचे सांगताना भारत आणि अमेरिकेपुढे समसमान संधी व आव्हाने असल्याचे त्यांनी नमूद केले.

    अमेरिकेतील लोकांनी भारत समजून घ्यावा व अधिकाधिक विद्यार्थ्यांनी देखील भारताला भेट द्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गारसेटी यांनी सांगितले.

    महाराष्ट्राशी कृषी क्षेत्रात सहकार्य वाढविण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील चर्चा झाल्याचे सांगून शिक्षण कौशल्य प्रशिक्षण व हवामान अनुकुल कृषी या विषयात सहकार्य वाढविण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

    देशाच्या सर्व भागातून आंब्यांच्या पेट्या

    राजदूत म्हणून तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसह देशाच्या सर्व भागातून आपणांस आंब्याच्या पेट्या मिळत असून आपले कुटुंब अद्याप भारतात आले नसल्याने इतक्या आंब्यांचे करायचे काय असा प्रश्न आपणास पडला आहे. आंब्यांचे दुकानच लावता येईल की काय याची चाचपणी करण्याची सूचना आपण दूतावासातील कर्मचाऱ्यांना केली असल्याची मिश्किल टिप्पणी राजदूत गारसेटी यांनी केली.

    अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात यावे : राज्यपाल रमेश बैस

    महाराष्ट्राचे राज्यपाल या नात्याने आपण २६ विद्यापीठांचे कुलपती असून अलीकडेच राज्यातील काही विद्यापीठांचे अमेरिकेतील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कशी करार झाल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले.

    जगातील युवा देश असलेल्या भारताला अमेरिकेने कौशल्य प्रशिक्षण व कौशल्य वर्धन करण्यासाठी तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविण्यासाठी सहकार्य करावे असे राज्यपालांनी सांगितले.

    अमेरिकेतील सर्वोत्तम विद्यापीठांनी राज्यात आपल्या शाखा सुरु कराव्या किंवा राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

    ऐतिहासीक संदर्भ

    राजदूतांनी कालच साबरमती आश्रमाला भेट दिल्याचे समजल्याने सांगून महात्मा गांधी यांनी राजभवन उभे असलेल्या जागी सन १९१५ साली भेट दिली होती असे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. सन १८९६ साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांनी देखील तत्कालीन गव्हर्मेंट हाऊस येथे भेट दिल्याचे राज्यपालांनी राजदूतांना सांगितले. अमेरिकेतील नागरिकांनी आणि विशेषतः विल ड्युरांट सारख्या लेखकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत केल्याबद्दल राज्यपालांनी राजदूतांकडे कृतज्ञता व्यक्त केली.

    बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी, राजकीय व आर्थिक विषयक काउंसल क्रिस्तोफर ब्राऊन व राजकीय सल्लागार प्रियांका विसरिया – नायक उपस्थित होते.