बंद

    17.05.2022 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारोह संपन्न

    प्रकाशित तारीख: May 17, 2022

    राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा दीक्षांत समारोह संपन्न

    दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    मुक्त व दूरस्थ शिक्षण हे आधुनिक युगातील ज्ञानग्रहणाचे पसंतीचे माध्यम झाले आहे. आज अनेक खासगी विद्यापीठे व शिक्षण संस्था देखील दूरस्थ शिक्षणाचा उपयोग करीत आहेत. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी नाशिक येथील मुक्त विद्यापीठाच्या मुख्यालयातून राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, कृषि वित्त महामंडळाचे अध्यक्ष व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ चारुदत्त मायी, कुलगुरु डॉ प्रशांतकुमार पाटील, कुलसचिव डॉ दिनेश भोंडे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

    ज्ञानदान प्रक्रियेचा वेदकाळापासून आढावा घेताना आगामी काळात मुक्त विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा देखील लाभ घ्यावा, असे आवाहन राज्यपालांनी केले. मुक्त विद्यापीठाला नॅकचे ए मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

    छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या नावाने अध्यासन केंद्रे सुरु करावी : उदय सामंत

    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्थापनेपासून ५० ते ६० लाख पदव्या प्रदान केल्याचे सांगून मुक्त विद्यापीठाने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता इंदोर, गोवा, हैद्राबाद, दुबई यांसह मराठी लोक जेथे आहेत तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

    छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी मुक्त विद्यापीठाने त्यांच्या नावांचे अध्यासन सुरु करावीत अशी सूचना सामंत यांनी केली.

    दीक्षांत समारोहात १७६११३ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.