बंद

    16.09.2021: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वेदपाठशाळेला भेट

    प्रकाशित तारीख: September 17, 2021

    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वेदपाठशाळेला भेट

    पुणे, दि. १६: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी कोथरूड येथील वेदाचार्य श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेला भेट दिली. वेदपाठशाळेच्या कार्याचे कौतुक करताना राज्यपालांनी वेदपाठशाळेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबाबतची माहिती जाणून घेतली.
    कोथरूड परिसरातील वेदभवन येथे उभारण्यात आलेल्या अभ्यागत कक्षाची पाहणी करून राज्यपाल महोदयांनी उपस्थित प्रमुख प्रतिनिधीशी संवाद साधला. वेदशाळेच्या माध्यमातून वेदाचा प्रचार व प्रसाराचे मोठे कार्य होत आहे. वेद जाणून घेण्यासाठी विदेशातून लोक भारतात येतात. हजारो वर्षांपासून एकाकडून दुसऱ्याकडे वेदाचे ज्ञान आले आहे. हा ज्ञानप्रवाह पुढे नेण्यासाठी वेदपाठशाळेच्या माध्यमातून घैसास गुरुजी करत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
    वेदपाठशाळेचे प्रमुख घैसास गुरुजी यांनी राज्यपाल महोदयांचे स्वागत करताना आश्रमातर्फे चालविल्या जाणाऱ्या सेवाकार्याची तसेच विविध उपक्रमांची माहिती दिली.
    यावेळी वसंत ठकार यांनी वेदशाळेसाठी मदतीचा दिलेला धनादेश राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते घैसास गुरुजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
    वेदशाळेचे विश्वस्त मुकुंदराव चितळे, दत्तात्रय सप्रे यांच्यासह प्रमुख प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
    ००००