16.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
अभिनेते इरफान खान यांना मरणोत्तर पुरस्कार
भिवंडी महापौर प्रतिभा पाटील, भाऊ कदम, समीरा गुजर देखील सन्मानित
अहिल्यादेवी यांच्या श्रेष्ठ कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
समाजाच्या अनेक क्षेत्रात आज नैतिक ह्रास होताना दिसत आहे. स्वार्थाचा विचार बळावत आहे. स्वतः पलीकडे जाऊन आपल्या परिसरासाठी, समाजासाठी व देशासाठी थोडे जरी काम केले तरीही समाज उन्नत होईल. या दृष्टीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई व सावित्रीबाई फुले यांच्या श्रेष्ठ कार्यातून समाजाने प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
सागा फिल्म्स फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. १६) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.
राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार सुधाकर श्रुंगारे व सागा फिल्म्स फाउंडेशनचे संस्थापक सागर धापटे – पाटील यावेळी उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर या दूरदृष्टी लाभलेल्या शासक होत्या असे सांगून अहिल्यादेवींनी उत्तराखंड येथील बद्रीनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे देखील काम केले होते याचे स्मरण राज्यपालांनी दिले. आज देखील समाजात अन्न, वस्त्र, औषध व निवाऱ्यापासून वंचित लोक आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने समाजसेवेचे छोटेसे कार्य जरी केले तरी देखील समाज जिवंत राहील, असे राज्यपालांनी सांगितले.
दिवंगत अभिनेते इरफान खान यांना त्यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल यावेळी मरणोपरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. इरफान खान यांच्या पत्नी शुतपा इरफान खान यांनी राज्यपालांकडून पुरस्कार स्वीकारला.
भिवंडीच्या महापौर प्रतिभा पाटील, हास्य अभिनेते भाऊ कदम, सूत्रसंचालक-निवेदिका डॉ समीरा गुजर, किर्तनकार हभप सुदामभाऊ गोरखे कान्हा गुरुजी (जीवन गौरव), समाजसेविका डॉ आयुषी देशमुख, भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी अंकिता डोळस सोमणे, समाजसेविका अनघा बंडगर, डॉ स्वागत तोडकर, माळशिरसचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, पत्रकार रेखा खान, इस्कॉन राजगडचे सुंदर प्रभुजी यांसह ३० जणांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.