बंद

    16.03.2025: संयुक्त अरब अमिराती दूतावासातर्फे आयोजित रमझान इफ्तार राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    प्रकाशित तारीख: March 16, 2025
    16.03.2025 : राज्यपालांच्या उपस्थितीत इफ्तार सोबत 'सहिष्णुता व सहअस्तित्व' या विषयावर एका सर्वधर्म परिसंवाद संपन्न

    संयुक्त अरब अमिराती दूतावासातर्फे आयोजित रमझान इफ्तार राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न

    मानवता टिकवून ठेवायची असेल तर अमिरातीप्रमाणे सहअस्तित्वाचा मंत्र अंगीकारला पाहिजे: राज्यपाल राधाकृष्णन

    संयुक्त अरब अमिरातीमध्ये आज जगभरातील विविध देशांचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. विभिन्न धर्मियांची अमिरातीमध्ये प्रार्थना स्थळे आहेत. जगात मानवता टिकवून ठेवायची असेल तर संयुक्त अरब अमिरातीप्रमाणे सहअस्तित्वाचा मंत्र अंगीकारला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    संयुक्त अरब अमिरातीच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासातर्फे रविवारी (दि. १६) हॉटेल ट्रायडंट येथे एका रमझान इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. इफ्तार सोबत दूतावासातर्फे ‘सहिष्णुता व सहअस्तित्व’ या विषयावर एका सर्वधर्म परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

    जगातील प्रत्येक जीव अन्नासाठी झटत असतो. उपवास ही संकल्पना प्रत्येक धर्माने अंगिकारली आहे. उपवासामुळे सहिष्णुता वाढते तसेच भुकेल्यांचे दुःख अनुभवता येते, असे राज्यपालांनी सांगितले. रमझान उपवास काटेकोर वेळापत्रकानुसार पाळल्या जातो ही कौतुकास्पद बाब असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    रमजान निमित्त सर्व धर्मीयांना बोलावून ‘सहिष्णुता व सह-अस्तित्व’ या विषयावर परिसंवाद घडवून आणल्याबद्दल राज्यपालांनी संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्यदुतांचे आभार मानले.

    संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल् मर्झुकी यांनी आपल्या प्रस्तावनेत संयुक्त अरब अमिरातीमध्ये २०० देशांचे लोक शांततेने राहत असल्याचे सांगितले. प्रत्येकाने सहिष्णुता वाढवावी व द्वेषभावनेचा त्याग करावा असे त्यांनी सांगितले.

    यावेळी हिंदू, मुस्लिम, पारशी, शीख, बोहरा, बौद्ध तसेच ख्रिश्चन धर्मगुरु व प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय पारपत्र अधिकारी राजेश गावंडे तसेच विविध धर्मांचे धर्मगुरू तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.