बंद

    16.03.2021 : संयुक्त अरब अमिराती वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    प्रकाशित तारीख: March 16, 2021

    संयुक्त अरब अमिराती वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

    संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन सलमान मोहमद अलमर्झुकी यांनी मंगळवारी (दि. १६) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वेळा संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली असून भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील पूर्वापार दृढ असलेले संबंध आज सर्वोत्तम स्तरावर आहेत. आपल्या महाराष्ट्रातील कार्यकाळात आपण व्यापार, वाणिज्य तसेच इतर क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे अलमर्झुकी यांनी राज्यपालांना सांगितले.

    गेल्या काही महिन्यात अमिराती येथील अनेक रुग्ण मुंबईला वैद्यकीय उपचारांसाठी आले. या लोकांना वैद्यकीय व्हिजा दिल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानले. मुंबईला आल्यापासून आपल्याला मिळालेल्या आदरातिथ्याबद्दल त्यांनी राज्यपालांकडे कृतज्ञता व्यक्त केली.

    संयुक्त अरब अमिराती भारताचा दहावा सर्वात मोठा थेट विदेशी गुंतवणूकदार आहे. वाणिज्यदूतांनी आपल्या कार्यकाळात येथील चेंबर ऑफ कॉमर्स व उद्योजक यांचेशी संपर्क साधून व्यापार संबंध अधिक दृढ करावे. संयुक्त अरब अमिरातीला भारतातील रिअल इस्टेट व पायाभूत सुविधा या क्षेत्रात गुंतवणुकीस वाव असल्याचे त्यांनी वाणिज्यदूतांना सांगितले. संयुक्त अरब अमिराती येथे राहणारे ३.५ दशलक्ष भारतीय हे उभय देशांना जोडणारा दुवा असल्याचे राज्यपालांनी सांगितले.