15.12.2025 महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी
महाविद्यालयातील प्रत्येक खेळाडूची ‘भारत स्पोर्ट्स पोर्टल’ वर नोंदणी व्हावी
महादेवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करा : राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे
मुंबई, दि.15 : राज्यातील सर्व विद्यापीठांअंतर्गत महाविद्यालयांमध्ये प्रत्येक खेळाडूंची भारत स्पोर्ट्स पोर्टल वर नोंद करून महादेवा प्रोजेक्टसाठी फुटबॉल टीम तयार करण्याचे निर्देश माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
‘लोकभवन’ येथे महादेवा प्रोजेक्ट तसेच इतर खेळांच्या प्रगती संदर्भात माननीय राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणाली द्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यपालांचे उपसचिव राममूर्ती, लोकभवनमधील सह संचालक (वै. वि. मं.) विकास कुलकर्णी तसेच दूरदृश्य प्रणाली द्वारे सर्व विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक उपस्थित होते.
सचिव डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, माननीय राज्यपाल महोदय यांच्या सूचनांनुसार प्रत्येक महाविद्यालयामध्ये खेळाडू आहेत, त्यांची नोंद होणे गरजेचे आहे. या साठी क्रीडा विभागाने भारत स्पोर्ट्स पोर्टल वरती प्रत्येक महाविद्यालयांतर्गत कोणता खेळ खेळाडू खेळतोय याची नोंद करावी यासाठी प्रत्येक महाविद्यालयांनी देखील एक मोहीम राबवावी. सर्व विद्यापीठांनी आपल्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांच्या क्रीडा संचालकांना याबाबत आवश्यक त्या सूचना द्याव्यात. खेळांसाठी चांगल्या प्रकारच्या मार्गदर्शक सूचना खेळाडूंना मिळण्यासाठी क्रीडा विभागाने जोमाने काम करावे.
सचिव डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी क्रीडा प्रतिष्ठानने याबाबत महत्त्वपूर्ण भूमिका निभावून यामध्ये ॲथलेटिक्स ,कबड्डी त्याचप्रमाणे विविध खेळांसाठी असलेल्या खेळाडूंची नोंद करावी जेणेकरून खेळाडूंची माहिती एकत्र उपलब्ध होईल. दर आठवड्यात करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष क्रीडा अधिकाऱ्यांनी भेट देऊन याबाबत जनजागृती करावी. भारत स्पोर्ट्स पोर्टल वरती प्रत्येक विद्यार्थ्याचे अकाउंट तयार झाल्यानंतर एकाच प्लॅटफॉर्मवर ती सर्व माहिती उपलब्ध होईल.
सचिव डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, एकदा का खेळाडूंची नोंद झाल्यानंतर स्थानिक स्तरावरील स्पर्धे प्रमाणे विद्यापीठ स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी मदत होईल. तालुका जिल्हा राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण होण्यासाठी मदत होईल. नुकतेच जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी मुंबईत आले होते. महाराष्ट्र शासनाचा ‘महादेवा प्रोजेक्ट’ हा सुरू झाला असून त्यामध्ये फुटबॉल टीम साठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने फुटबॉल टीम तयार करावी जेणेकरून चांगल्या खेळाडूंची निर्मिती होईल. सर्वांनी उत्स्फूर्तपणे काम केल्यास नक्कीच प्रत्येक खेळाडूंची चांगल्या प्रकारे नोंदणी होऊन आपल्याला क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करता येईल असेही ते म्हणाले.