15.12.2020 : दृष्टिहीन जनांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
दृष्टिहीन जनांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे राज्यपालांचे आश्वासन
मुंबई (दि.१५) नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (नॅब ) संस्थेतर्फे दृष्टिहीन लोकांच्या कल्याणसाठी राज्यात चालविण्यात येणाऱ्या अंध मुलींची निवासी शाळा, नेत्रचिकित्सा रुग्णालय तसेच इतर प्रकल्पांसाठी आपण सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिले.
नॅबच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आयोजित अंध व्यक्तींच्या कल्याणासाठी उभारण्यात येणार्या ध्वज निधी संकलन मोहिमेचा शुभारंभ राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे मंगळवारी (दि. १५) संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नॅबचे उपाध्यक्ष सूर्यभान साळुंके यांनी राज्यपालांच्या शर्टला ध्वजाची छोटी प्रतिकृती लावली तसेच राज्यपालांनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.
दृष्टीहीन व्यक्तींना सामान्य माणसापेक्षाही अधिक ज्ञानग्रहण शक्ती असते असे सांगून आज अंध, दृष्टिहीन व दिव्यांग व्यक्ती आयएएस सारख्या परीक्षा पास होत आहेत तसेच उद्योग व्यवसायात चांगली कामगिरी करीत आहेत असे राज्यपालांनी सांगितले.
अंध, दिव्यांगांच्या शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, रोजगार व पुनर्वासनासाठी नॅब ही संस्था अतिशय चांगले काम करीत आहे, असे सांगताना संस्थेच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आपण नॅबच्या नाशिक कार्यालयाला लवकरच भेट देऊ असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.
नाशिक येथील दृष्टिहीन मुलींच्या निवासी शाळेतील २५ मुलींच्या शिक्षणासाठी शासन अनुदान मिळावे, नॅब संस्थेने दृष्टिहीन व्यक्तींच्या ज्ञान व मनोरंजनासाठी नाशिक येथे ‘संवेदना उद्यान‘ तयार केले आहे; त्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संवेदना उद्यान निर्माण करावेत, अंध पुनर्वसन कार्यासाठी कॉर्पोरेटस कडून सामाजिक दायित्व निधी उपलब्ध करून द्यावा अश्या मागण्यांचे निवेदन संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांनी राज्यपालांना दिले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी संस्थेचे सहसचिव व दिव्यांग उद्योजक भावेश भाटीया यांच्या ‘रुक जाना नहीं’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला नॅबचे कोषाध्यक्ष विनोद जाजू, सहकोषाध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*****