14.10.2020: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवनेर गणेश दर्शन पुरस्कार वितरीत
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शिवनेर गणेश दर्शन पुरस्कार वितरीत
रामशेट ठाकूर, डॉ. जगन्नाथराव हेगडे करोना देवदूत पुरस्काराने सन्मानित
दानशूर व्यक्तींनी करुणा जागविल्यास करोनाला पराभूत करता येईल : राज्यपाल
करोनाने जगभर थैमान घातले असताना भारतात करोनाचा मृत्युदर सर्वात कमी होता तसेच रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक होता, याचे श्रेय आपल्या देशातील सेवाभावी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य सेवक, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती तसेच निःस्वार्थ सेवा करणाऱ्या करोना देवदूतांना जाते असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. देश महामारीच्या विळख्यात असताना समाजातील दानशूर व्यक्तींनी करुणा जागाविल्यास आपण करोनाला पराभूत करू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दैनिक शिवनेर तर्फे राजभवन येथे आयोजित सन्मान करोना देवदुतांचा या कार्यक्रमात निवडक समाजसेवींना करोना देवदूत पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
माजी खासदार रामशेट ठाकूर, माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे यांसह डॉ अमेय देसाई, प्रशांत कारुळकर व लीलाधर चव्हाण यांना यावेळी करोना देवदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
शिवनेर गणेश दर्शन स्पर्धेत रक्तदान शिबीर आयोजित करून अधिकाधिक रक्त संकलन करणाऱ्या तीन सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्यपालांच्या हस्ते प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक म्हणून चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह, शिवनेरचे संपादक तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे गव्हर्नर राजकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.