बंद

    14.08.2025: प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ नागरिकांसमोर आणण्याची गरज-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: August 15, 2025
    14.08.2025: Governor visits the Deccan College Post Graduate and Research Institute (Deemed to be University) Pune

    प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ नागरिकांसमोर आणण्याची गरज-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

    पुणे, दि.१४: प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ नागरिकांसमोर आणून त्याचे जतन व संवर्धन डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेने करावे, अशी सूचना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केली.

    डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था येथे आयोजित भारतीय ज्ञान प्रणाली-दृश्यश्रव्य कक्ष आणि ‘पुनः’ छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु सुरेश गोसावी, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ) कुलगुरु डॉ. प्रसाद जोशी, राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्रा. शाहिदा अन्सारी, डॉ. बन्सी लव्हाळे, सुहाणा उद्योग समूहाचे आनंद चोरडिया आदी उपस्थित होते.

    राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेमार्फत प्राचीन वारसा, संस्कृती, पंरपरा जतन व संवर्धनाबाबत सुरु असलेले कार्य तसेच मंदीर, जुनी नाणी, हस्तलेख, संस्कृत शब्दकोश प्रकल्पाबाबत करण्यात येत असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. पुरात्व विभागाच्यावतीने मराठा इतिहास आणि पुरातत्व संग्रहालयाचे करण्यात येणाऱ्या संगणकीकरण प्रकल्पाकरिता प्रस्ताव सादर करण्याची सूचना करुन या प्रकल्पास सहकार्य करण्यात येईल, असेही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.

    कार्यक्रमापूर्वी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे विद्यार्थी असतांना वास्तव्य करीत असलेल्या कक्षाला भेट देवून पाहणी केली.

    यावेळी कुलगुरु डॉ. जोशी यांनी डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या संस्कृत कोशप्रणाली आणि मराठी बोली भाषेबाबत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. तसेच भारतीय ज्ञान प्रणाली-दृश्यश्रव्य कक्षाचे कामकाज स्वामी विवेकानंद संशोधन फाऊंडेशच्या सहकार्याने करण्यात येणार आहे, असेही डॉ. जोशी म्हणाले.

    प्रा. अन्सारी यांनी पुरात्व विभागाच्या कामकाजाबद्दल माहिती देऊन त्या पुढे म्हणाल्या, विभागामार्फत संशोधन आणि मंदिराचे सर्वेक्षण करण्यात येत. येत्या काळात विभागाच्यावतीने मराठा इतिहास आणि पुरातत्व संग्रहालयाचे संगणकीकरण करण्यात येणार आहे, असेही प्रा. अन्सारी म्हणाल्या.

    यावेळी आदी चोरडिया यांनी ‘पुनः’ या ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्राचीन, धार्मिक वारसा दर्शविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाबाबत माहिती दिली.