बंद

    14.06.2022 : राजभवनातील क्रांतिकारकांचे दालन युवापिढीसाठी प्रेरणा केंद्र ठरेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

    प्रकाशित तारीख: June 14, 2022

    पंतप्रधानांच्या हस्ते राजभवनातील ‘क्रांती गाथा’ दालनाचे उदघाटन संपन्न

    राज्यपालांच्या ‘जलभूषण’ निवासस्थानाचे देखील उदघाटन केले

    राजभवनातील क्रांतिकारकांचे दालन युवापिढीसाठी प्रेरणा केंद्र ठरेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

    पूर्णत्वाला आलेले पाटबंधारे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावे : राज्यपाल

    क्रांतिकारकांचे दालन हे तीर्थस्थळ : मुख्यमंत्री

    ज्या ब्रिटिश कालीन बंकर मध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या क्रांतीकारकांना मारण्याची साहित्य सामग्री ठेवली जायची , त्याच बंकरमध्ये क्रांतिकारकांचे दालन तयार करून त्यांच्या स्मृती चिरस्थायी करण्याचा राजभवनाचा प्रयत्न स्तुत्य आहे असे सांगून राजभवनातील ‘क्रांती गाथा’ दालन युवकांसाठी प्रेरणा केंद्र ठरेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.

    स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी ‘जल भूषण’ या राज्यपालांच्या कार्यालय व निवासस्थान असलेल्या इमारतीचे देखील उदघाटन करण्यात आले.

    यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री आदिती तटकरे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

    असंख्य लोकांच्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असे सांगून भारतीय स्वातंत्र्य लढ्याने जगभरातील अनेक स्वातंत्र्य आंदोलनांना प्रेरणा दिली असे मोदी यांनी सांगितले. राजभवनातील बंकरचा स्वातंत्र्यानंतर सात दशके कुणाला थांग पत्ता लागू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त करून आपण स्वतः थोर स्वातंत्र्य सेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी २००३ साली लंडनहून भारतात आणून त्यांचे त्यांच्या इच्छेनुसार भारतात विसर्जन केले असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले.

    महाराष्ट्र राजभवनाने स्वातंत्र्य प्राप्तीनंतर प्रथमच तिरंगा झेंडा फडकताना पाहिला असे सांगून सन १९४२ साली छोडो भारत आंदोलन राजभवन येथून जवळच ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरु झाले याची आठवण मोदी यांनी केली.

    राज्यात अनेक मोठे व मध्यम पाटबंधारे प्रकल्प निधी अभावी २० ते ४० वर्षांपासून रखडत असून काही प्रकल्प ८० टक्के पूर्णत्वाला येऊन देखील लोकांना ५ ते ७ दिवस पाणी मिळत नाही अशी परिस्थिती आहे. यासाठी या योजना लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यावेळी व्यक्त केली.

    आपण राज्यातील २३००० कातकरी आदिवासी कुटुंबांना नियमित हक्काची घरे मिळवून देण्यासाठी मदत केली तर आदिवासींच्या बांबू उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी देखील आपण प्रयत्न केले असे राज्यपालांनी यावेळी नमूद केले. आदिवासींसाठी अजूनही खूप काही करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    राज्यात दोन वर्षांपासून वैधानिक विकास मंडळे गठीत झाली नसली तरी देखील आपण घटनात्मक कर्तव्य म्हणून विकास कामांचा आढावा घेत असतो असे राज्यपालांनी सांगितले.

    विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण विद्यापीठांमधील दीक्षांत समारोहाचे संचालन व भाषणे मराठीतूनच व्हावी यासाठी आपण आग्रही राहिलो असे राज्यपालांनी सांगितले. विद्यापीठांमधून सागरी विज्ञान व इतर संस्था सुरु होण्यासाठी देखील आपण प्रयत्न केले असे त्यांनी सांगितले.

    राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या जलभूषण इमारतीच्या व क्रांती गाथा दालनाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या श्रमिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवन येथे लवकरच ५०० किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    स्वातंत्र्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवणाऱ्या क्रांतिकारकांमुळेच आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत असे सांगून २०१६ साली सापडलेल्या बंकरमध्ये निर्माण केलेले क्रांतिकारकांचे दालन हे एकप्रकारे तीर्थस्थळ असून त्याच्या उदघाटनाला उपस्थित राहणे सार्थकी झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

    सुरुवातीला पंतप्रधान मोदी यांनी ‘क्रांती गाथा’ दालनाची पाहणी केली तसेच राजभवनातील ऐतिहासिक श्रीगुंडी देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी इतिहासकार आणि लेखक डॉ विक्रम संपत यांनी पंतप्रधानांना ‘क्रांती गाथा’ दालनाची माहिती दिली.