बंद

    14.02.2025 : राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा

    प्रकाशित तारीख: February 14, 2025
    राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा

    राज्यपालांकडून गोंडवना व नागपूर विद्यापीठाचा आढावा

    विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची गोंडवाना विद्यापीठाला सूचना

    राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. १४) गडचिरोली येथील गोंडवना विद्यापीठाचा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आढावा घेतला.

    कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांनी राज्यपालांपुढे दोन्ही विद्यापीठांचे सादरीकरण केले.

    इटली, जर्मनी, जपान आदी देशांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना विदेशी भाषा शिक्षण देखील उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी राज्यपालांनी कुलगुरुंना केली.

    राज्यपालांनी यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या महत्वाच्या योजनांची अंमलबजावणी, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना, कमवा आणि शिका योजना, नव्या शैक्षणिक परिसराचा विकास, विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, कृषी विद्यापीठासोबत सहकार्य, आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाचे दस्तावेजीकरण करणे आदी विषयांवर चर्चा केली व यथायोग्य सूचना केल्या.

    कुलगुरु बोकारे यांनी यावेळी गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, रोजगारक्षम अभ्यासक्रम, शैक्षणिक वेळापत्रक, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुविधा, भाषांतर प्रकल्प, विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष, स्वच्छ भारत अभियान, ‘विकसित भारत’ उपक्रम, क्रीडा स्पर्धा आदी विषयांवर सादरीकरण केले.

    सादरीकरणाच्या दुसऱ्या भागात राज्यपालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा आढावा घेतला. यावेळी कुलगुरूंनी विद्यापीठाच्या शतकोत्तर महोत्सवी वर्षातील उपक्रमांची राज्यपालांना माहिती दिली तसेच संशोधन आणि विकास कार्याबद्दल अवगत केले.

    राज्यातील सर्व विद्यापीठांनी आपले शैक्षणिक वेळापत्रक तयार करून ते पुरेसे अगोदर प्रसिद्ध करावे; प्रत्येक परीक्षांच्या सत्रनिहाय तारखा जाहीर कराव्या तसेच परीक्षांचे निकाल ३० दिवसांमध्ये लावावे असे सांगताना दीक्षांत समारंभाची तारीख देखील विद्यापीठांनी अगोदरच जाहीर करावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    सैन्यदलात अधिकाधिक युवकांनी भरती होण्यासाठी विद्यापीठांनी विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवावे अशी सूचना देखील राज्यपालांनी यावेळी केली.

    सादरीकरणाच्या वेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ राजेंद्र काकडे, गोंडवाना विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ अनिल हिरेखण उपस्थित होते.