13.12.2021: राज्यपालांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान
वनराईचा चालता बोलता ज्ञानकोश म्हणून परिचित असलेल्या कर्नाटकातील ज्येष्ठ आदिवासी पर्यावरण कार्यकर्त्या तुलसी गौडा यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सामाजिक परिवर्तनासाठी मदर तेरेसा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हार्मनी फाउंडेशनतर्फे राजभवन येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते दुष्काळ मुक्त महाराष्ट्र साकारण्यासाठी कार्य करीत असलेल्या ‘पानी फाउंडेशन’च्या डॉ अविनाश पोळ यांना देखील सन्मानित करण्यात आले.
मुंबई येथील युवा पर्यावरण कार्यकर्ती आद्या जोशी तसेच मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभोजीत मुखर्जी यांना देखील मदर तेरेसा स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी हार्मनी फाउंडेशनचे अध्यक्ष व अल्पसंख्यांक आयोगाचे माजी उपाध्यक्ष डॉ अब्राहम मथाई उपस्थित होते.