बंद

    13.06.2024: डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या  कुलगुरुपदी नियुक्ती

    प्रकाशित तारीख: June 13, 2024

    डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या  कुलगुरुपदी नियुक्ती
     
    राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.

    सातारा येथील  डॉ धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय येथे  प्राचार्य असलेल्या डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची नियुक्ती ते पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, या पैकी जे अगोदर त्या दिवसापर्यंत केली आहे.  

    सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. डी टी शिर्के यांची २१ ऑक्टोंबर २०२२ च्या शासन आदेशान्वये नियुक्ती केली होती. त्यानंतर दिनांक ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या मा. राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

    डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत.

    कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ एस. एस. मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती.

    सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आप्पासाहेब पाटील, पुणे येथील भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शिवाजीराव कदम, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे ‘कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते.

    समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.