बंद

    12.10.2021 : सीआरपीएफच्या सायकल रॅलीस गडचिरोलीतून प्रारंभ

    प्रकाशित तारीख: October 12, 2021

    राष्ट्रीय एकता आणि अखंडता राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कटीबद्ध रहावे – राज्यपाल कोश्यारी

    सीआरपीएफच्या सायकल रॅलीस गडचिरोलीतून प्रारंभ

    गडचिरोली, (जिमाका) दि.12: देशाबाहेरील तसेच देशातील विविध समाजविघातक प्रवृत्तींचा बीमोड करण्यात आपल्या सुरक्षा दलांनी मोठे योगदान दिले असले तरी राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता राखण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. यामुळे सर्वसामान्यांनी त्यासाठी निर्धाराने कटीबद्ध राहण्याची गरज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे व्यक्त केली. त्यांच्या हस्ते आज येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या गडचिरोली- केवडीया सायकल रॅलीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गडचिरोली बटालियनकडून आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, सीआरपीएफच्या अतिरिक्त महानिर्देशक (दक्षिण विभाग) रश्मी शुक्ला, पश्चिम विभागाचे महानिर्देशक रणदीप दत्ता आदी उपस्थित होते.

    देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या महान प्रयत्नांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले, वल्लभभाई हे अत्यंत दुरदृष्टीचे नेते होते. त्यांच्या नियोजनामुळे आज देशाला मोठा लाभ झाला आहे. अलिकडच्या काळात त्यांच्या कार्याची महती विशेषत्वाने जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सीआरपीएफने आयोजित केलेली ही रॅली देशातील विविध भागातील नागरिकांना एकतेचा संदेश देणारी ठरेल. समाजविघातक प्रवृत्तींमुळे आज समाजाला अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. आपली सुरक्षा दले त्यांचा मुकाबला करण्यासाठी सर्वार्थाने प्रयत्नशील आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्याची जबाबदारी सगळयांचीच आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी त्यांना यथाशक्ती पाठबळ द्यावे. असे आवाहन करुन राज्यपालांनी आपल्या भाषणात सीआरपीएफच्या योगदानाचा विशेष गौरव केला.

    पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशाची एकता आणि अखंडता सर्वाधिक महत्त्वाची असून त्यासाठी सर्वानीच निष्ठेने प्रयत्न करावेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध दलातील जवान आज खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. एकता आणि अखंडतेची भावना संवर्धित करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. गडचिरोली परिसरात काही समस्यांच्या निराकरणासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने प्रयत्न केले जातील. विशेषत: रोजगार निर्मितीसह पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही प्रयत्न होणार आहेत. कोविड काळात राज्यात उत्तम समन्वयाने काम झाल्याचेही यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. सीआरपीएफने बजावलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

    ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत सीआरपीएफच्या पुरुष आणि महिला सदस्यांचे पथक आज गडचिरोली येथून गुजरातमधील केवडीया येथे जाण्यासाठी रवाना झाले. या सायकल रॅलीला राज्यपालांनी यात्रेला हिरवी झेंडी दाखविली. ही रॅली केवडीया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी म्हणजे 31 ऑक्टोबरला पोहोचणार आहे. 20 दिवसात 925 किलोमीटर अंतर पार करुन रॅलीतील सदस्यांकडून राष्ट्रीय एकतेसाठी संदेश देण्यात येणार आहे. देशाच्या इतर भागातूनही या दलाची पथके केवडीया येथे पोहोचणार आहेत. शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींचा राज्यपालांच्या हस्ते यावेळी सन्मान करण्यात आला.

    श्रीमती शुक्ला यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सीआरपीएफच्या उपक्रमांची माहिती दिली. सीआरपीएफच्या जवांनाकडून यावेळी विविध देशभक्तिपर गीतांवर नृत्ये आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. स्थानिक कलावंताकडून लोकनृत्ये सादर झाली. उपमहानिरीक्षक मानसरंजन यांनी आभार मानले. या कार्यक्रमास राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, नागपूर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक पी.आर. जम्बोलकर आदी यावेळी उपस्थित होते.

    जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली