बंद

    12.08.2024: राज्यपालांची छेडानगर सुब्रमण्यम समाज मंदिराला भेट; चंडी महायज्ञात दिली पूर्णाहुती; पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांचे संबोधन

    प्रकाशित तारीख: August 13, 2024
    Governor visits the Lord Murugan temple at Chembur, Mumbai

    राज्यपालांची छेडानगर सुब्रमण्यम समाज मंदिराला भेट; चंडी महायज्ञात दिली पूर्णाहुती; पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांचे संबोधन

    महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी छेडानगर,चेंबूर, मुंबई येथील दक्षिण भारतीयांच्या भव्य व जुन्या श्री सुब्रह्मण्य समाज मंदिराला सोमवारी (दि. १२) भेट दिली.

    आपल्या स्थापनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सुब्रह्मण्य समाजाच्या श्री मुरुगन (कार्तिक स्वामी) मंदिरात चंडी महा यज्ञ, लक्ष्मी नारायण हृदय पारायण तसेच संपूर्ण चतुर्वेद पारायणाचे राज्यपालांच्या उपस्थितीत समापन संपन्न झाले.

    भारतात लोककल्याणासाठी व शांततेसाठी वेळोवेळी महायज्ञ व अनुष्ठानाचे आयोजन होत आले आहे. त्यामुळे देशात शांती व सौहार्द निर्माण होऊन देश सुजलाम सुफलाम राहण्यास मदत झाली आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

    यावेळी राज्यपालांनी सुब्रह्मण्य समाज मंदिरात वल्ली – देवसेना सहित श्री सुब्रह्मण्य स्वामी, महागणपती, अय्यप्पन, गुरुवायुरप्पन, दुर्गा देवी, शिव पार्वती आणि नवग्रहांचे दर्शन घेतले तसेच चंडी महायज्ञात पूर्णाहुती दिली.

    महाराष्ट्र ही संतांची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असून कांची कामकोटी पिठाचे महास्वामी शंकराचार्य तसेच जयेंद्र स्वामी यांचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम राहिले आहे असे पिठाचे विद्यमान पिठाधिपती विजयेंद्र सरस्वती यांनी दृकश्राव्य माध्यमातून संबोधित करताना सांगितले.

    छेडानगर येथील मंदिरात आजवर चार वेळा पूर्ण कुंभाभिषेक झाल्या मुळे हे मंदिर विशेष महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी श्री सुब्रमण्यम समाजाचे सचिव पी. सुब्रमण्यम, डी. विजया भानू गणपतीगल, श्रुती स्मृती सेवा ट्रस्ट व श्री सुब्रह्मण्य समाजाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.