बंद

    12.06.2021 : ब्लाईंड रिलीफ असोशिएशनचे कार्य समाजासाठी आदर्शवत : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: June 14, 2021

    ब्लाईंड रिलीफ असोशिएशनचे कार्य समाजासाठी आदर्शवत : राज्यपाल

    नागपूर दि .12: नेत्रहिनांसाठी शहरातील दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन निष्ठेने करीत असलेले कार्य हे या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांसाठी आदर्शवत आणि एक मानदंड निर्माण करणारे असल्याचे, प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल श्री कोश्यारी यांनी आज शहरातील दक्षिण अंबाझरी मार्गावरील ‘दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशनला भेट दिली. त्यानिमित्ताने संस्थेच्या नवदृष्ट्री सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे ,सचिव नागेश कांडगे उपस्थित होते.

    प्रारंभी त्यांनी परिसरातील संस्थेच्या अंध विदयालयास भेट दिली. यावेळी अंध जलतरणपटू ईश्वरी पांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.कोश्यारी यांचे स्वागत केले. राज्यपालांनी संस्थेचे संस्थापक स्व.रावसाहेब वामनराव वाडेगावकर यांच्या अर्धकृती पुतळयास अभिवादन करून तेथील परिसरात वृक्षारोपण केले. अंध विदयालयातील अभ्यासिका,ब्रेल संगणक कक्ष, कार्यशाळेचीही पाहणी केली. संस्थाध्यक्ष श्री.पांढरीपांडे यांनी अंध विदयालयाची माहिती यावेळी दिली.

    सूरदासांच्या अवीट रचनांचा दाखला देत श्री.कोश्यारी म्हणाले की, दिव्यांग हे उच्च प्रतिभेचे धनी असतात. समाजात आजुबाजुला शारीरिक व्यंगत्व असणाऱ्यांकडे कलेचे विशेष अंग असल्याचे दिसून येते. त्यांचा न्यूनगंड दूर करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी सुरू असलेले संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. नेत्रहीनांना स्वावलंबी करणारी दि ब्लाईंड रिलीफ असोशिएशन ही दिव्यांग विकासाचे देशातील उत्कृष्ट मॉडेल करू शकणारी संस्था आहे. 1928 पासून नेत्रहीनांच्या सर्वागिण विकासासाठी कार्यरत असलेली ही संस्था आजही तितक्याच निष्ठेने आणि समर्पण भावनेने कार्य करत आहे. मानवसेवा हीच ईशसेवा असल्याचे सांगून भविष्यात संस्थेला अपेक्षित सहकार्य करण्याबाबत राज्यपालांनी आश्वस्त केले. कार्यक्रमाचे संचलन मेघा पाध्ये तर आभार गजानन रानडे यांनी मानले.

    (जिल्हा माहिती कार्यालय नागपूर)