11.09.2023 : लोकायुक्तांकडून राज्यपालांना वार्षिक अहवाल सादर
लोकायुक्तांकडून राज्यपालांना वार्षिक अहवाल सादर
राज्याचे लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे (निवृत्त) यांनी राज्यपाल रमेश बैस यांची सोमवारी (दि. ११) राजभवन येथे भेट घेऊन त्यांना लोकायुक्त व उपलोकायुक्त यांच्या कामकाजासंबंधीचा ४९ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला.
सन २०२१ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयात एकूण ६६१७ प्रकरणे कार्यवाहीकरिता उपलब्ध होती. यापैकी ३२०२ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२१ च्या वर्ष अखेरीस ३४१५ प्रकरणे प्रलंबित राहिली, अशी माहिती लोकायुक्त कार्यालयाने दिली.
महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्था गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर करण्यात यशस्वी ठरली आहे. चौकशीसाठी हाती घेण्यात आलेल्या तक्रारींपैकी जवळजवळ ७५ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींमधील गाऱ्हाण्यांचे समाधानकारक निवारण झाले, असल्याचे लोकायुक्त कार्यालयाने नमूद केले आहे.