11.06.2022 : राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान
राज्यपालांच्या हस्ते रतन टाटा यांना मानद डॉक्टरेट प्रदान
रतन टाटा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नव्याने स्थापन झालेल्या एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या पहिल्या विशेष दीक्षांत समारोहात ज्येष्ठ उद्योगपती व टाटा समूहाचे अध्वर्यु रतन टाटा यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी प्रदान करण्यात आली.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. ११) राजभवन येथे टाटा यांना ही पदवी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली.
रतन टाटा हे केवळ उद्योगपती किंवा कॉर्पोरेट जगताचे प्रमुखच नाहीत तर ते त्याहीपेक्षा विनम्रता, मानवता व नितिमूल्ये जपणारे श्रेष्ठ व्यक्ती असून नव्या उद्योजकांसाठी दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले.
रतन टाटा यांनी मानद पदवी स्विकारुन विद्यापीठाचा तसेच उपस्थितांचा गौरव वाढवला. टाटा यांचा सन्मान हा संपूर्ण टाटा समूहाचा तसेच टाटा घराण्याचा सन्मान असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
विद्यापीठांनी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी : रतन टाटा
एचएसएनसी समूह विद्यापीठ ही एक दूरदर्शी संकल्पना असून विद्यापीठांनी नीतिमत्ता व मानवी मूल्ये यांच्या वाटेने देशाला पुढे नेणारी सामर्थ्यशाली युवा पिढी घडवावी अशी अपेक्षा रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केली.
दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे मुख्य संरक्षक डॉ. निरंजन हिरानंदानी, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, एचएसएनसी बोर्डाचे अध्यक्ष अनिल हरीश, माजी अध्यक्ष किशु मानसुखानी व कुलगुरु डॉ हेमलता बागला प्रामुख्याने उपस्थित होते.