बंद

    11.05.2022 लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

    प्रकाशित तारीख: May 12, 2022

    लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न

    महामहिम राज्यपाल श्री.भगत सिंह कोश्यारी आणि पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिल्या ऑनलाईन शुभेच्छा

    अलिबाग, दि.11 (जिमाका):- लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ आज बुधवार, दि.11 मे 2022 रोजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली चे अध्यक्ष प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
    यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, विद्यापीठ परीक्षा नियंत्रक प्रा.डॉ.विवेक साठे,कार्यकारी परिषदेचे सदस्य प्राचार्य नागेश आलुरकर, प्रा.एस.एल.नलबलवार, प्राचार्य व्ही.के.रेदासनी, प्राचार्य उल्हास शिंदे, प्राचार्य राहुल बारजिभे, प्राचार्य अभिजीत वाडेकर, प्राचार्य किशोर ओतारी, प्राचार्य नरेंद्र कान्हे, डॉ.श्रीमती एम.डी.लड्डा, डॉ. विवेक वाडके, श्रीनिवास बेंडखळे, राजेश पेडणेकर, प्राचार्य दिनकर घेवाडे, डॉ. अमित शेष, विद्यापीठातील इतर प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
    यावेळी दीक्षांत समारंभास उपस्थित विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करताना महामहिम राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती श्री.भगत सिंह कोश्यारी यांनी संपूर्ण जग विविध क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. “आत्मनिर्भर भारत” बनविण्यात तांत्रिक विभागाचा मोठा सहभाग असून तांत्रिक विकास अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नवनवीन संकल्पनांचा शोध लावून देश घडवतील, असा विश्वास व्यक्त करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
    यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनीही पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांची वाटचाल भरभराटीची होवो, अशा ऑनलाईन शुभेच्छा देत विद्यापीठाबाबतच्या प्रलंबित बाबी शासन स्तरावरून प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही दिली.
    समारंभाचे प्रमुख अतिथी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करून काम करून दाखविणे हे कौतुकास्पद आहे. शिवरायांची राजधानी असलेला हा लढवय्या जिल्हा आहे. संकटांचे संधीत रूपांतर करण्याचे आव्हान पेलणे अतिशय महत्त्वाचे आहे. नव्या केंद्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब केल्याने येणारा काळ निश्चित बदलेल. ध्येय प्राप्तीसाठी मेहनत केल्याने, समर्पित झाल्याने बदल निश्चितच होईल.
    ते म्हणाले, सर्वांगीण विकास झालेला नागरिक घडविणे, हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे. विविध विषयांची माहिती करून घेणे, त्यांचा योग्य ठिकाणी वापर करणे, सामाजिक दायित्व निभावणे, हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. कोणतेही क्षेत्र आता एकांगी राहिलेले नाही, प्रत्येक क्षेत्र विविधांगी घटकांनी मिळून बनत आहे. विविध विषयांचे ज्ञान मिळविणे, विविध विषय हाताळणे आजच्या काळाची गरज आहे. “स्वयंम” या भारतीय ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ज्ञान मिळवू पाहणाऱ्याना अनेक प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोविड काळात शिक्षण बंद होऊ न देण्याचे आव्हान सर्वांनी यशस्वीरित्या पेलले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण शिक्षण प्रक्रिया सुरूच ठेवली.
    प्रा.डॉ.सहस्त्रबुद्धे पुढे म्हणाले की, पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान व अनुभवदेखील आवश्यक आहे. विविध कंपन्यांबरोबर इंटर्नशीपकरिता सामंजस्य करार करावेत. AICT ने तयार केलेल्या वेबपोर्टलवर इंटर्नशीपकरिता 01 कोटी भारतीय विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. “स्टार्ट अप” संकल्पना अंमलात आणणारा आपला भारत देश जगातील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात मोठा देश ठरला आहे. जगातील जवळपास 41 युनिकॉर्न मोठ्या मोठ्या कंपन्यांनी एक बिलियन डॉलर्सची गुंतवणूक भारतात करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. देशातील विविध भागातून शहर, गावातून नवनवीन संकल्पना घेऊन अनेक विद्यार्थी पुढे येत आहेत. स्वच्छ भारत, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आपल्या देशाचा विकास होत आहे. पुढील दोन वर्षात “भारत नेट” प्रकल्पाच्या माध्यमातून देशातील सर्व गावे इंटरनेटद्वारे जोडले जाणार आहेत, त्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. विविध खेळणी बनविण्यात आपला देश पुढे जाऊ शकतो. भारतीय संस्कृतीवर आधारित खेळणी बनविण्याचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. आयुष्यात शॉर्टकट नको, कुठल्याही मोहात पडू नये, तत्वांशी प्रामाणिक राहावे, नवे प्रयत्न करीत राहणे, चुकांमधून शिकणे, रोज काहीतरी नवे आत्मसात करणे, आयुष्यभर शिकण्याची प्रवृत्ती जोपासणे, हे यशस्वी आयुष्यासाठी आवश्यक आहे. आजच्या तंत्र युगामध्ये मानवी संबंध टिकविणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कुटुंब, शैक्षणिक संस्था यांच्याशी आपले असलेले नाते कायमस्वरूपी टिकवून ठेवणे आजच्या काळाची गरज आहे.
    कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीताने तर सांगता राष्ट्रगीताने झाली.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुलसचिव प्रा.डॉ.भगवान जोगी यांनी केले.
    कुलगुरू प्रा.डॉ.कारभारी विश्वनाथ काळे यांनी प्रास्ताविक केले. तसेच याप्रसंगी त्यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवालही सादर केला. तद्नंतर पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवीदान समारंभ संपन्न झाला.