10.12.2022: राज्यपालांच्या हस्ते सुब्रमण्यम स्वामी यांना हिंदुत्वाचे आधारस्तंभ पुरस्कार प्रदान
राज्यपालांच्या हस्ते सुब्रमण्यम स्वामी यांना हिंदुत्वाचे आधारस्तंभ पुरस्कार प्रदान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ विचारवंत व संसदपटू सुब्रमण्यम स्वामी यांना ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे येथे करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संस्थापिका व पत्रकार डॉ वैदेही तमन तसेच संतसमुदाय उपस्थित होता.
भारत पूर्वीपासून अध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे मनुष्य जीवनाचे सार्थक आहे ही येथील संतांची शिकवण राहिली आहे. स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण परमहंस यांनी साक्षात परमात्म्याचे दर्शन घडवले. त्याप्रमाणे देशातील संत समाज देशाला दिशा दाखवून भारताला पुन्हा एकदा जगद्गुरू करतील असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उपस्थित संत समाजापैकी सद्गुरू नारायण महाराज, गहिनीनाथ महाराज औसेकर, स्वामी कर्मवीर, स्वामी गिरीशनंद सरस्वती, महंत सीतारामदास निर्मोही गोवर्धन व डॉ उमाकांतानंद सरस्वती महाराज यांना देखील राज्यपालांच्या हस्ते ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सद्गुरू रितेश्वर महाराज यांच्या वैदेही तमन यांनी लिहिलेल्या जीवनचरित्राचे देखील राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.