10.12.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मानव हक्क दिन साजरा
राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवन येथे मानव हक्क दिन साजरा
समाजाचा शैक्षणिक स्तर वाढत असताना मानवी मूल्यांचा ह्रास होणे चिंताजनक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
एकीकडे समाज सुशिक्षित होत आहे, शिक्षणाचा स्तर वाढत आहे. मात्र दुसरीकडे मानवी मूल्यांचा ह्रास होत आहे. हा मूल्यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी शिक्षणासोबत संस्कारांना महत्व दिले गेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगातर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाला आयोगाचे अध्यक्ष न्या. (नि.) कमलकिशोर तातेड, मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश न्या.सत्यरंजन धर्माधिकारी, आयोगाचे सदस्य भगवंतराव मोरे व एम ए सईद, आयोगाचे सदस्य सचिव रवींद्र शिसवे तसेच निमंत्रित व विद्यार्थी उपस्थित होते.
भारतामध्ये नारी शक्तीला देवीचे स्थान दिले आहे. परंतु आज संस्कारांच्या अभावी महिलांशी दुर्व्यवहार केला जातो हे खेदजनक आहे. महिला व मुलांवर संकट आले असताना लोक मदतीला धावण्याचे साहस न दाखवता बघ्याची भूमिका घेऊन फोटो काढत असतात. या पार्श्वभूमीवर महिला, अपंग, लहान मुले यांच्या अधिकारांप्रती समाजाने अधिक सजग राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जीवन पद्धतीमध्ये केवळ मनुष्यमात्रांच्या कल्याणाचा विचार केला नाही तर, पशुपक्षी, झाडे वनस्पती व इतकेच नव्हे तर नदी, सरोवरे यांच्या देखील कल्याणाचा विचार केला आहे. सर्व प्राण्यांमध्ये विवेक बुद्धी केवळ मनुष्याला मिळाली असल्यामुळे माणसाने उपेक्षित समाज बांधवांच्या हक्काचा विचार केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
राज्य मानवाधिकार आयोग आपले काम निष्ठेने करताना ते अधिक लोकाभिमुख करण्याकरिता जनजागृती करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आयोगाचे अध्यक्ष न्या. तातेड यांचे अभिनंदन केले.
मानवाला मानव म्हणून जगण्यासाठी लागणारे अधिकार म्हणजे मानवाधिकार अशी व्याख्या करताना नागरिकांनी आपल्या अधिकारांसोबतच आपल्या कर्तव्याबद्दल देखील जागरूक राहिले पाहिजे असे न्या सत्यरंजन धर्माधिकारी यांनी सांगितले. मानवाधिकार दिवस केवळ १० डिसेंबर या दिवसापुरता मर्यादित न राहता तो आयुष्याचा भाग झाला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष न्या. तातेड यांनी मानवाधिकार आयोगाने केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी ‘अमर रहे मानवाधिकार’ या नाट्याचे देखील सादरीकरण करण्यात आले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते आरोग्य अधिकार या विषयावरील टाटा समाज विज्ञान संस्थेच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.