10.12.2020 : ‘भारताने जगाला प्राणिमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार दिला’ : राज्यपाल
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन
‘भारताने जगाला प्राणिमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार दिला’ : राज्यपाल
संयुक्त राष्ट्र संघटनेने दिनांक १० डिसेंबर १९४८ रोजी सकलराष्ट्रीय मानवाधिकार उद्घोषणेचा स्वीकार केला व दरवर्षी १० डिसेंबर हा दिवस मानवाधिकारांप्रती जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून पाळल्या जातो. मात्र भारतात मानवाधिकाराची फार प्राचीन परंपरा आहे. भारतीय संस्कृतीने केवळ मनुष्यमात्रांच्या अधिकारांचाच नाही तर सकल जीवसृष्टी, प्राणिमात्र, निसर्ग व वसुंधरेच्या अधिकाराचा व्यापक विचार केला असून हा विचार जगाला मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगातर्फे आंतर राष्ट्रीय मानावाधिकार दिनाचे औचित्य साधून एका ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते, त्याचे राजभवन येथून दूरस्थ पद्धतीने उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.
मानवाधिकार आयोगासमोर मानवाधिकार उल्लंघनाच्या तक्रारी येत असतात. अश्यावेळी आयोगाने सर्व बाजूंचा साकल्याने विचार करून न्यायनिवाडा करावा अशी सूचना राज्यपालांनी केली.
चर्चासत्राच्या उद्घाटनाला राज्य मानवाधिकार आयोगाच्या कार्यवाहू अध्यक्ष एम.ए. सयिद, अतिरिक्त मुख्य सचिव विजय कुमार गौतम व नितीन करीर, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, टाटा समाजविज्ञान संस्थेच्या विधी विभागाचे अधिष्ठाता अरविंद तिवारी, इंटरनेशनल जस्टीस मिशनचे उपाध्यक्ष संजय मकवान, व महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप उके प्रामुख्याने उपस्थित होते.