बंद

    10.10.2022 : महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणाच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: October 10, 2022

    महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणाच्या माध्यमातून दिशा देण्याचे कार्य केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    पुणे, दि. १०: महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी इंग्रज राजवटीत महिला शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणली. त्यांनी महिला शिक्षणाद्वारे देशासह महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

    कर्वेनगर येथील कर्वे सामाजिक संस्थेच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर पाठक, विश्वस्त संदीप खर्डेकर उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, इंग्रज राजवटीत महिलांना शिक्षण मिळत नव्हते, त्यांना घरकामापुरते मर्यादित ठेवण्यात आले होते. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्या काळात स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले. पारंपरिक बंधने तोडून स्त्रियांचे पुर्नविवाह घडवून आणले. महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या श्रीमती नाथीबाई दामोधर ठाकरसी विद्यापीठाच्या माध्यमातून महिला शिक्षणाचे हे कार्य आजही सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यावेळी नागरिकांमध्ये महिला शिक्षणाविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली.

    महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. त्याप्रमाणे आज स्वतंत्र भारतात स्त्री शिक्षणाला महत्व देण्यात येत आहे. आपण सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्याचे कार्य केले पाहिजे. सामाजिक काम निरपेक्ष भावनेने आणि पूर्ण समर्पण स्वरुपात केल्यास आपल्याला निश्चित आंनद मिळतो.

    महर्षी कर्वे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी संस्थेतील विद्यार्थ्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करून आपली छाप सोडावी यादृष्टीने त्यांच्यावर संस्कार करण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरणात आपला इतिहास, गौरव, संस्कार यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे या धोरणाच्या माध्यमातून समाजाला नवीन दिशा देण्याचे कार्य करण्यात येत आहे, असेही श्री. कोश्यारी म्हणाले.

    प्रास्ताविकात श्री. खर्डेकर यांनी संस्थेची माहिती दिली. यावेळी डॉ. चित्रलेखा राजुस्कर लिखित ‘विशेष ऋतुरंग’ पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. तसेच संस्थेच्यावतीने मनोरुग्ण व त्यांच्या कुटुंबियासाठी समुपदेशनाच्यादृष्टीने तयार करण्यात आलेल्या संपर्क पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘नशामुक्त भारत अभियान’ मध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींचा प्रातिनिधीक स्वरुपात यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.