बंद

    10.08.2022 : भारतीय नौदलातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

    प्रकाशित तारीख: August 11, 2022

    भारतीय नौदलातर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन

    अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील शौर्य पुरस्कार विजेत्यांना मानाचा मुजरा

    भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    भारतात नौदलाचे महत्व अनादी काळापासून आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे महत्व ओळखून आरमाराची बांधणी केली. भारतीय नौदलाने आपल्या बुद्धीचातुर्य व शौर्याने अनेक युद्धांत देशाला विजय मिळवून दिला. भविष्यातील आव्हाने मात्र वेगळ्या प्रकारची असतील. या आव्हानांना तोंड देण्यासाठी नौदलाला महत्वाची भूमिका बजावावी लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नौदलाच्या पश्चिम मुख्यालयातर्फे बुधवारी (दि. १०) आयोजित कृतज्ञता सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सेवानिवृत्त तसेच सेवेत असलेल्या शौर्य विजेत्या अधिकारी व जवानांचा स्मृतिचिन्ह नेऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    कुलाबा येथील नौदलाच्या कॅप्टन महेंद्र नाथ मुल्ला सभागृहात झालेल्या या कृतज्ञता सोहळ्याला नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल अजेंद्र बहादूर सिंह तसेच नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    नौसेनेच्या ज्या अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून देशरक्षणाचे कार्य केले आहे अश्या शौर्य विजेत्या अधिकारी व जवानांचा सत्कार करताना आपणांस स्वतःला गौरवान्वित झाल्यासारखे वाटत आहे असे राज्यपालांनी सांगितले. जगात इजिप्त, रोम अश्या विविध सांस्कृती उदयाला आल्या आणि लयाला गेल्या, परंतु भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून टिकून आहे याचे श्रेय आपल्या शूरवीर जवानांना देखील आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यपालांच्या हस्ते माजी नौसेना प्रमुख ऍडमिरल विजय सिंह शेखावत, कमांडर अशोक कुमार, कमांडर अनुप वर्मा, कॅप्टन होमी मोतीवाला, सर्जन कमांडर अलोक बॅनर्जी, कॅप्टन कौस्तुभ विजयकुमार गोसावी, क्लिअरन्स डायव्हर आनंद सोपान सावंत व पेटी ऑफिसर आदेश कुमार या शौर्य विजेत्या माजी आजी अधिकाऱ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    यावेळी नौसेना शौर्य पदक विजेत्या नौसेनेतील २९ आजी माजी अधिकाऱ्यांचा व जवानांचा देखील सत्कार करण्यात आला.