10.07.2021: आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळावा : राज्यपाल
आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळावा : राज्यपाल
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य व कुलगुरुंसाठी संयुक्तपणे आयोजित केलेल्या योग, ध्यान व प्राणायाम शिबिराचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवि शंकर यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर, आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रमाचे महाराष्ट्र निमंत्रक हिमांशू नगरकर, तसेच विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे बाधित झालेले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य पूर्ववत करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी श्री श्री रवि शंकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग, ध्यान व प्राणायाम शिबीर आयोजित केल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी कुलगुरूंनी प्रयत्न करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून श्री श्री रवि शंकर भारतीय संस्कृती व मुल्ये यांचा जगभर प्रचार करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
टीम वर्क ही जपानची विशेषता आहे, प्रेसिशन ही जर्मनीची विशेषता आहे तशी मानवी मुल्ये आणि आत्मियता हे भारतीयांचे वैशिष्ट्य आहे असे सांगून विद्यार्थ्यांप्रती आत्मियता व आपुलकी कमी झाल्यामुळे विद्यार्थी तणावाखाली आले आहेत. तणावामुळे विद्यार्थ्यांची ग्रहणशक्ती व धारणाशक्ती कमी झाली असे सांगून विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत असलेले सद्गुण शोधून त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे श्री श्री रवि शंकर यांनी सांगितले.
यावेळी श्री श्री रवि शंकर यांनी कुलगुरू, प्राचार्य व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
*****