बंद

    10.06.2026: संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग यांच्यातील दरी दूर करण्यासाठी समन्वयाची गरज– राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    प्रकाशित तारीख : June 10, 2026
    Governor inaugurates an International Workshop on “Mid-TRL Technology Transition and Innovation Acceleration in Pune

    संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग यांच्यातील दरी दूर करण्यासाठी समन्वयाची गरज– राज्यपाल जिष्णु देव वर्मा

    पुणे, दि. १० : संशोधन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यातील दरी दूर करण्यासाठी विद्यापीठे, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा
    यांनी केले.

    कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) तंत्रज्ञान विद्यापीठ आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे इंटरनॅशनल सेंटर, पाषाण येथे १० ते १२ जून दरम्यान आयोजित ‘तंत्रज्ञान संक्रमण आणि नवोपक्रम गतीवर्धक’ (Technology Transition and Innovation Accelerator) या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

    यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरूड, कॅनियस इंटरनॅशनलचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद पिंपरकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, संशोधक, उद्योजक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, सीओईपी आणि कॅनियस इंटरनॅशनल यांच्यात झालेला सामंजस्य करार हा केवळ प्रशासकीय औपचारिकता नसून संशोधन आणि प्रत्यक्ष परिणाम यांमधील दरी दूर करण्याचा दृढ संकल्प आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवोपक्रम आणि सहकार्याचे केंद्र बनविण्याच्या प्रयत्नांना बळ मिळणार आहे.

    सीओईपी ही देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक संस्थांपैकी एक असून तिने उत्कृष्ट अभियंते, तंत्रज्ञ, प्रशासक, उद्योगपती, उद्योजक आणि विचारवंत घडविले आहेत. राष्ट्रनिर्मितीत या संस्थेचे योगदान महत्त्वपूर्ण असून ती भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक आकांक्षांचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.

    राज्यातील २९ विद्यापीठांचे कुलपती म्हणून विविध विद्यापीठांतील संशोधन कार्याचा जवळून अभ्यास करण्याची संधी मिळाल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, देशात उच्च दर्जाचे संशोधन होत असले तरी नवोपक्रम आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये मोठी दरी आहे. अनेक मौल्यवान संशोधन प्रकल्प प्रयोगशाळा, शैक्षणिक नियतकालिके आणि परिषदांपुरते मर्यादित राहतात. त्यांचे रूपांतर उद्योग, शासन आणि समाजासाठी उपयुक्त, परिणामकारक आणि व्यापक प्रमाणावर वापरता येणाऱ्या उपायांमध्ये होणे आवश्यक आहे.

    देशात १.३ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आणि हजारो संशोधन प्रकल्प सुरू असतानाही त्यांपैकी मोजक्याच नवकल्पना बाजारपेठेपर्यंत पोहोचतात. विद्यापीठे, उद्योग, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि शासकीय संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून संशोधनाचे व्यापारीकरण आणि उद्योगाभिमुख विकासाला चालना देण्यासाठी अशा कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरतील, असे त्यांनी नमूद केले.

    प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी थेट संवाद साधण्याची तसेच आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्याची संधी या कार्यशाळेतून मिळणार असल्याचे सांगून त्यांनी भारताला प्रगत उत्पादन, एरोस्पेस, संरक्षण आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील जागतिक केंद्र बनविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली

    महाराष्ट्र देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात सुमारे १५ टक्के योगदान देत असून राज्यात ४० हजारांहून अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कार्यरत आहेत. राज्याचा खरा स्पर्धात्मक फायदा हा मानवी भांडवलात असून अभियंते, शास्त्रज्ञ आणि उद्योजकांच्या ज्ञानाचे आर्थिक मूल्यात रूपांतर करण्यास अशा उपक्रमांमुळे चालना मिळते, असेही त्यांनी सांगितले.

    यावेळी बोलताना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी भारताची ओळख नवोपक्रम घडविणाऱ्या राष्ट्राची असली पाहिजे, असे प्रतिपादन केले. संकल्पनेपासून ते व्यापारीकरणापर्यंतचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक दुवे मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

    पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या माध्यमातून पुण्याला पुन्हा एकदा देशाच्या ‘विचार नेतृत्वा’चे केंद्र बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यातील जागतिक दर्जाच्या संशोधन संस्था आणि वेगाने विकसित होत असलेली स्टार्टअप परिसंस्था यामुळे ज्ञान आणि उद्योग यांचा प्रभावी संगम घडत असल्याचे त्यांनी नमूद केले.

    स्टार्टअप्सना संधी देण्यासाठी प्रशासकीय दृष्टिकोनात बदल आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी ‘अश्युअर्ड फ्रेमवर्क’ची संकल्पना मांडली. तरुण उद्योजकांवर विश्वास ठेवून त्यांना प्रारंभीच संधी दिल्यास ते जागतिक स्तरावरील उद्योग उभारू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

    भारताकडे मोठी क्षमता असून आता त्या क्षमतेला गती देण्याची गरज आहे. भारतीय कल्पना, भारतीय गुंतवणूक आणि भारतीय प्रयत्नांतून निर्माण होणारी संपत्ती देशातच राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
    महात्मा गांधी यांच्या ‘More from Less for More’ या विचाराचा संदर्भ देत डॉ. माशेलकर यांनी तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी परवडणारे आणि सुलभ करण्यावर भर दिला. आरोग्य क्षेत्रातील कमी खर्चातील निदान तंत्रज्ञानाची उदाहरणे देत त्यांनी समाजाभिमुख नवोपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

    मिलिंद पिंपरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात या कार्यशाळेचे प्रयोजन विशद करतांना, भारत देश जागतिक दर्जाचे हब होण्यासाठी अधिकाधिक संशोधन, नवोपक्रम आणि यात गतिमानता येण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. त्यासाठी अशा कार्यशाळा महत्वाच्या असल्याचे सांगितले.

    यावेळी या कार्यशाळेच्या निमित्ताने तयार केलेल्या ‘ हॅन्डबुक’ चे राज्यपाल आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रा. भिरूड यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.