बंद

    09.12.2025: सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध – राज्यपाल

    प्रकाशित तारीख : December 10, 2025
    09.12.2025: 'भारतीय संविधान गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्र विधानसभेतील भाषणाच्या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आज लोकभवन, नागपूर येथे करण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच विधानपरिषद व विधानसभेचे सदस्य उपस्थित होते. राज्य घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र विधानसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक २६ मार्च २०२५ रोजी हे भाषण दिले होते. सभागृहाच्या सदस्यांच्या मागणीनुसार हे भाषण पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.

    सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध
    – राज्यपाल आचार्य देवव्रत
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावर आधारित

    ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन

    नागपूर, दि. 9 : नागरिकांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर अशी संविधानिक चौकट भारतीय संविधानाने आखून दिलेली आहे. बंधुत्व आणि लोकशाहीचा भाव संविधानात आहे. संविधानाने समाजाला, राष्ट्राला जोडण्याचे काम केले. सहज व सोप्या भाषेत संविधानाची माहिती पुस्तक स्वरूपात उपलब्ध होत असल्याचे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

    भारतीय गणराज्याच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल’ या विषयावर 26 मार्च 2025 रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते लोकभवन येथे प्रकाशित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधिमंडळाच्या वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे या पुस्तकाचे संकलन आणि संपादन करण्यात आले आहे.

    पुस्तक प्रकाशनप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्रिमंडळ व विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

    राजभवनचे नामकरण लोकभवन झाले आहे, याचा आनंद आहे. आज भारत जगातील दुसरी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे. संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे आपला देश आता वेगाने विकसित होत आहे. संविधानातील बारकावे या पुस्तकातून जाणून घेता येईल. इतर भाषेतही या पुस्तकाचा अनुवाद व्हावा, असे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले.

    सर्वांगीण विचार करून संविधानाची निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    भारतीय संविधान हे जगातील एक सर्वोत्तम संविधान आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा विविध संस्थानांमध्ये विभाजित होता. देशात सांस्कृतिक ऐक्य होते, मात्र राजकीय ऐक्य नव्हते. त्यामुळे सर्वांना एकत्र करत सर्वांगीण विचार करून संविधान तयार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान मूल्य जपणाऱ्या विविध देशाच्या लोकशाहीचा अभ्यास केला, आणि आपल्या देशातील शाश्वत मूल्यांवर आधारित संविधान निर्मिती केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुस्तक प्रकाशनप्रसंगी म्हणाले.

    संविधानाने सर्वांना संधीची समानता दिली. संविधानिक व्यवस्था आपल्याकडे कुणीही केंद्रीत करू शकत नाही. देशातील अनेक खटल्यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संसद आणि न्यायालयाचे अधिकार परिभाषित केले आहेत. पुस्तक वाचल्यानंतर सर्वसामान्य माणूस देखील भारताचे संविधान व त्याची मूल्ये समजू शकेल, असे ते म्हणाले. यापूर्वी ‘बजेट कसे असावे’ हे पुस्तक अतिशय सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. संविधान हे सोपे आहे, क्लिष्ट नाही हे सांगण्याचा पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला. आता ते पुस्तक स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचा आनंद असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले.

    इतर भाषेतही पुस्तकाचा अनुवाद व्हावा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    संविधानाची माहिती अत्यंत सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणावर आधारित हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत संविधान सर्वांपर्यंत पोहोचवेल. विधिमंडळाची गौरवशाली परंपरा आहे. ही परंपरा अनेक वर्षापासून जपण्यात आली आहे. अनेक देशांकडे आपआपले संविधान आहे. मात्र आपले संविधान हे समाजाचा सर्वागीण विचार करणारे आहे. या पुस्तकाचा अनुवाद इतर भाषेतही व्हावा, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

    श्री.फडणवीस हे संविधान समजून घेणारे आणि पुस्तक रूपात मांडणारे मुख्यमंत्री आहेत. सर्वच विषयांचा त्यांचा सखोल अभ्यास असतो. बजेटवर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिले आहे. आज प्रकाशित होणारे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. राज्यशास्त्राचे विद्यार्थी, लोकनेते, नागरिक सर्वांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे, असेच आहे.

    संविधानिक विचार सोप्या शब्दात पोहोचतील – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    जनसामान्यांना सोप्या शब्दात संविधानाची माहिती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या भाषणाची पुस्तक रूपात ओळख होण्याची गरज होती. या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत संविधानिक विचार सोप्या शब्दात पोहोचतील, असा विश्वास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आपल्या प्रस्तावनेत व्यक्त केला. या पुस्तकातून संविधानातील तरतुदीची माहिती मिळेल, असे ते पुढे म्हणाले.

    विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आभार मानले. लोकभवन नामकरण झाल्यानंतर संविधानावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळा लोकभवन येथे आयोजित करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, राज्यशास्त्राचा अभ्यासकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल. अतिशय सोप्या भाषेत हा संदर्भग्रंथ सर्वांना निश्चित उपयोगी ठरेल, असे प्रा.शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या पुस्तकाची प्रत विधिमंडळाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.

    कार्यक्रमादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या आतापर्यंतची वाटचाल अधोरेखित करणारी ध्वनिचित्रफित यावेळी दाखविण्यात आली.