09.12.2023: समाज सेवेत रोटरी सारख्या संस्थांचे मोठे योगदान – राज्यपाल
समाज सेवेत रोटरी सारख्या संस्थांचे मोठे योगदान
– राज्यपाल रमेश बैस
राज्यपालांच्याहस्ते वर्धा गौरव पुरस्काराचे वितरण
वर्धा, दि. 9 (जिमाका) : समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे मोठे योगदान आहे. या संस्थांनी जनसेवेचे काम निरंतर सुरु ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल महामहिम रमेश बैस यांनी केले.
विकास भवन येथे रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीच्या वर्धा गौरव पुरस्काराचे वितरण राज्यपालांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार सुबोध मोहिते, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणूगोपाल, रोटरीचे प्रकल्प अधिकारी चंद्रेश मांडविया, रोटरी क्लब ऑफ गांधी सिटीचे अध्यक्ष मनोज मोहता उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या भूमित विविध सामाजिक संस्था चांगले योगदान देत आहे. कोरोना सारख्या काळात रोटरीसह विविध संस्थांनी आपले योगदान दिले. बालकांच्या शस्त्रक्रिया, आरोग्य तपासण्या यासारखे उपक्रम रोटरी राबवित आहे. महिला सामाजिक क्रांती घडवू शकतात. त्यांना आत्मनिर्भर व स्वयंरोजगारासाठी प्रेरीत करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनासह विविध सामाजिक संस्था देखील योगदान देत असल्याचे राज्यपाल म्हणाले.
रोटरी इंटरनॅशनलचे जगभर नेटवर्क आहे. लोकांची सेवा, त्यांची एकजूट आणि परिवर्तन घडवून आणण्यासाठी ही संस्था आपुलकीने काम करते. शांतता प्रस्थापित करण्यासह आरोग्य, पाणी, स्वच्छता तसेच माता व बालके, शिक्षण अशा विविध क्षेत्रात रोटरीचे काम अभिनंदनीय आहे. देशाला कौशल्य विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासोबतच उद्योग व नव विचारांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणे, मुलींना सशक्त करण्यासाठी रोटरी सारख्या संस्थांची आवश्यकता आहे, असे राज्यपाल श्री.बैस म्हणाले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना सुबोध मोहीते यांनी, आपण समाजासाठी काही देणे लागतो याची भावना प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे, असे सांगितले. वर्धा सारख्या शहरात राहून मोठे उद्योजक झालेल्या व्यक्तींनी आपण आपल्या गावासाठी काय करु शकू याचा विचार करावा, असे ते म्हणाले. यावेळी आशा वेणूगोपाल, चंद्रेश मांडविया यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
यावेळी राज्यपालांच्याहस्ते मुळ वर्धा येथील रहिवासी आणि आता देशभर वेगवेगळ्या ठिकाणी नावलौकिक कमाविलेल्यांना वर्धा गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात सद्या मुंबई येथे असलेले भरत मेहता, तुषार व्यास, बैंगलूरू येथील शिरीष पुरोहीत तर दिल्ली येथील डॅा.प्रिती बजाज यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज मोहता यांनी केले तर आभार महेश मोकलकर यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी सदस्य तथा शहरवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.