09.11.2021: आगामी काळात शिक्षणामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतींचा मिलाफ असावा’ : राज्यपाल
डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूप या विषयावर राजभवन येथे परिसंवाद संपन्न
आगामी काळात शिक्षणामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतींचा मिलाफ असावा’ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
करोना काळात सर्वच नकारात्मक गोष्टी घडल्या असे नसून मुलांच्या शिक्षणात पालक अधिक लक्ष्य द्यायला लागले ही निश्चितच जमेची गोष्ट या काळात झाली आहे असे आपण मानतो. करोना नंतरच्या आगामी काळातील शिक्षणात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाचा मिलाफ असावा. उभय पद्धतींचे मिश्र शिक्षण हाच शिक्षणाचा भावी मार्ग राहील, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
नवभारत टाइम्स वृत्तपत्रातर्फे राजभवन येथे ‘डिजिटल काळातील शिक्षणाचे स्वरूप’ या विषयावर मंगळवारी (दि. ९) एक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी राज्यपाल बोलत होते. परिसंवादाला विविध शिक्षण संस्थांचे मुख्याध्यापक, प्रशासक व विश्वस्त उपस्थित होते.
गरज हीच शोधाची जननी असते. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यासाठी अनेक वर्षे समाजात अनुत्साह होता. मात्र करोना काळात सर्वांनी ऑनलाईन शिक्षणाचा अंगीकार केला. अर्थात, इंटरनेट सुविधा व स्मार्ट फोन सर्वांना उपलब्ध नसल्यामुळे किमान ६० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे वर्गखोलीत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला सध्या तरी पर्याय नाही असे मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झालाय: तज्ञांचे मत
ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे लाभ सर्वांनी पहिले आहेत त्यामुळे ही पद्धती कायम राहणार आहे. मात्र विद्यार्थ्यांचा सामाजिक व भावनिक विकास, कला व क्रीडा अभ्यास तसेच प्रात्यक्षिक कार्यासाठी प्रत्यक्ष शाळेतील शिक्षण आवश्यक असल्याचे मत सहभागी तज्ज्ञांनी व्यक्त केले.
करोना काळात विद्यार्थ्यांचा एकाग्रता अवधी अतिशय कमी झाला असून विद्यार्थ्यांचे लक्ष गुंतवण्यासाठी शैक्षणिक सामग्री विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे विकसित करावी लागेल असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. सायबर सुरक्षा या विषयाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
राज्यपालांच्या हस्ते यावेळी विविध शिक्षण संस्थांना ‘शिक्षण योद्धा’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाला नवभारत टाइम्सचे संपादक सुंदर चंद ठाकूर, लतिका शर्मा, धर्मेंद्र त्यागी, राहुल देशपांडे, सुमित मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.