बंद

    09.10.2024: राज्यपाल राधाकृष्णन यांनी साधला विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

    प्रकाशित तारीख: October 10, 2024
    09.10.2024: राज्यपालांची जालना जिल्हयामध्ये लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक तसेच कला क्रीडा क्षेत्रातील विविध समूहांशी चर्चा

    राज्यपाल राधाकृष्णन यांनी साधला विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद

    जालना,दि.09(जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आज जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता, त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रमुख, जालना जिल्ह्याच्या विकासाच्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उद्योग, आरोग्य, क्रिडा, साहित्य, क्रिडा, लोकप्रतिनीधी, राजकीय, माध्यम क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती तसेच इतर विविध घटकातील व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या जालना जिल्ह्याच्या विकासाशी संबंधीत समस्या आणि अपेक्षांची माहिती जाणुन घेतली.

    यावेळी आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक आदींची उपस्थित होते.

    श्री. राधाकृष्णन म्हणाले की, कृषी क्षेत्रात सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणावर राबवावीत. पावसाचे पाणी थांबविण्यासाठी जल संधारणाची कामे करावीत. लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी संरक्षीत करण्याचे नियोजन करावे. रेशीम उत्पादनात जिल्ह्याने चांगले काम केले असुन, या उद्योगास बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी जे अडथळे येत आहेत, ते दूर करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक प्रयत्न करावेत. नव उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना विविध क्रिडा प्रकारासाठी प्रोत्साहीत करावे.

    प्रारंभी राज्यपालांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत जिल्ह्याची वैशिष्ट्ये, समस्या, विकास कामांच्या स्थितीबाबतची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली.

    राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी उद्योजकांशी चर्चा करून उद्योग क्षेत्रातील अडचणी जाणून घेतल्या. तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशीही चर्चा करून त्यांनी विकास प्रक्रियेबाबत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच साहित्य, आरोग्य, सामाजिक, क्रीडा आणि माध्यम आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची भेट घेऊन त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.

    यावेळी बैठकीला लोकप्रतिनीधी, प्रशासनातील, साहित्यिक, खेळाडू, माध्यम प्रतिनीधी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.