09.10.2023 : राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा
राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा
केंद्र व राज्यशासन कौशल्य विकासाला सर्वाधिक चालना देत आहेत. आजकाल सर्वसाधारण पदवीपेक्षा कौशल्य विकासातील पदवीला महत्व आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाने राज्यात विद्यार्थ्यांसाठी विविध आधुनिक कौशल्य अभ्यासक्रम राबवावे, अशी सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केली.
राज्यपाल बैस यांनी सोमवारी (दि. ९) महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन येथे आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते.
पनवेल येथे आयटीआय पनवेलच्या जागेवर विद्यापीठाची इमारत तसेच आयटीआयची नवी वास्तू उभारण्याच्या कामाचे मार्च महिन्यात भूमिपूजन झाले असून पुढील वर्षी जून पर्यंत विद्यापीठाच्या इमारतीचे पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी यावेळी सांगितले.
कौशल्य विकास अभ्यासक्रमांची आवश्यकता लक्षात घेऊन विद्यापीठाने खारघर येथे एक इमारत भाड्याने घेऊन यावर्षीपासूनच कौशल्य विकासाचे १५ पदव्युत्तर, पदवी व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. यासाठी विद्यापीठाने अनुभवी प्राध्यापक देखील नेमले असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे येथे देखील यावर्षीपासून कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरु करीत असल्याचे त्यांनी राज्यपालांना सांगितले.
विद्यापीठाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (रिटेल), आदरातिथ्य, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अनॅलिटीक्स आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली. विद्यापीठाने आपले अभ्यासक्रम राबविण्यासाठी विविध नामवंत कंपन्यांशी सहकार्य करार केले असल्याचे त्यांनी सांगितले.