09.10.2021 : राज्यपालांकडून हिंदी संगीत रामायणाचे भरभरून कौतुक
आशा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत रामायण हिंदीत
राज्यपालांकडून हिंदी संगीत रामायणाचे भरभरून कौतुक
रामाचे गुणगान कितीही केले तरीही ते कमीच आहे, कारण त्यात नित्य नूतन असा आनंद आहे. राम सर्वांचा अंतर्यामी असल्यामुळे सर्वांच्या जवळच असतो. हिंदीतील संगीत रामायण मराठी गीत रामायणाप्रमाणेच अतिशय भावपूर्ण झाले असून त्याचे सादरीकरण उत्कृष्ट झाले, या शब्दात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिंदी संगीत रामायणाचे भरभरून कौतुक केले. यावेळी राज्यपालांनी संगित रामायणच्या चमूला १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
प्रिया सावंत यांच्या पुढाकाराने राजभवन येथे शनिवारी (दि ९) हिंदी संगीत रामायण संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
सुनील सुधाकर देशपांडे यांनी हिंदी भाषेत लिहिलेल्या संगीत रामायणातील रचनांना ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरबद्ध केले असून अनेक युवा गायक व गायिकांच्या मदतीने त्याचे सादरीकरण करण्यात आले. वेदश्री ओक व निनाद आजगावकर यांसह चमूने यावेळी रामायणातील सुश्राव्य रचना सदर केल्या. यावेळी व्यक्तिविकास व लीडरशिप ट्रेनिंग तज्ञ प्रिया सावंत यांच्या ‘काव्यांजली’ या काव्यसंग्रहाचे देखील प्रकाशन करण्यात आले.